Join us  

शमीच्या कमबॅकचं सीक्रेट! नवख्या गोलंदाजासारखा सराव अन् लहान मुलांसोबत खेळला, वाचा Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 4:45 PM

Open in App
1 / 9

मोहम्मद शमीने 8 नोव्हेंबर 2021 रोजी नामिबियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. यानंतर, तो तब्बल ११ महिने आणि ९ दिवसांनी सोमवारी भारताच्या ट्वेन्टी-२० फॉरमॅटमध्ये परतला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही, पण अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज असताना रोहित शर्माने डगआउटमधून बोलावून शमीकडे गोलंदाजी सोपवली. यानंतर शमीनं भेदक गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात कांगारुंच्या ४ खेळाडूंना माघारी धाडलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 9

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यानं आता शमीचं भारतीय ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन पक्क झालं असल्याचं बोललं जात आहे. पण शमीच्या पुनरागमनामागे त्यानं केलेली मेहनत अत्यंत महत्वाची आहे. शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

3 / 9

शमीनं ट्वेन्टी-२० संघात आपलं पुनरागमन व्हावं यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. यामागे त्याची एक वर्षाची मेहनत आहे. तसंच त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात केलेली गोलंदाजी हे खरंतर त्यानं त्याच्या टीकाकारांना दिलेलं उत्तर आहे, असं शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन म्हणाले.

4 / 9

गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर शमीला आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळालेली नाही, परंतु तो कसोटी संघाचा भाग होता आणि तो सतत सरावात गुंतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात 4 चेंडूत 3 विकेट घेत त्यानं सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आपण एक आहोत, हे त्यानं सिद्ध करुन दाखवलं आहे. याआधी त्याचा टी-२० वर्ल्डकपच्या मुख्य संघात त्याचा समावेश नव्हता. बुमराहच्या दुखापतीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला. मला वाटतं त्याचा संघात याआधीच समावेश करायला हवा होता, असं बदरुद्दीन म्हणाले.

5 / 9

भारतीय संघात त्याची भूमिका काय आहे हे शमीला माहीत आहे. कोणत्या परिस्थितीत गोलंदाजी कशी करायची याचा शमीनं सराव केला. दव पडल्यामुळे चेंडू भिजत असल्याने तो सरावाच्या वेळी ओला चेंडू घेऊन सराव करायचा. तसंच फलंदाजाविना विकेटवर यॉर्कर टाकण्याचा सराव करायचा. यामुळे त्याला ट्वेन्टी-२० सामन्यासाठीच्या आवश्यक गोलंदाजीचा सराव पक्का करता आला.

6 / 9

याशिवाय, सामन्याच्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, त्याने अकादमीतील मुलांबरोबर संघ तयार करून सामने खेळले, जेणेकरून त्याला सामन्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्याचा अनुभव मिळू शकेल. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी वेगवान आहे. शमी 140-145 च्या वेगाने गोलंदाजी करतो. तसंच तो जुन्या आणि नवीन दोन्ही चेंडूंनी चेंडू सीम करण्यात माहिर आहे.

7 / 9

कधी आणि कोणत्या परिस्थितीत गोलंदाजी कशी करायची हे त्याला माहीत आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यावर नजर टाकली तर गोलंदाजी करण्यासाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. त्याने येताच चार चेंडूत ४ बळी घेतले. त्यातून त्याचा आत्मविश्वास आणि अनुभव दिसून येतो.

8 / 9

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी शमीचा समावेश करण्यात आला होता, मात्र मालिकेपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर शमीने घरी परतल्यानंतर त्याच्या फार्म हाऊसवर सराव सुरू केला होता. सुरुवातीला फिटनेसवर काम केलं. त्यानंतर काही षटकं टाकायला सुरुवात केली. जेणेकरून त्याला त्याची लय सापडेल.

9 / 9

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सराव सामना जिंकला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. कर्णधार रोहितने मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला. शमीनं संधीचं सोनं करत केवळ 4 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. तसेच एक रनआउट देखील केला.

टॅग्स :मोहम्मद शामीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App