Mumbai Indians IPL 2022 : कुमार कार्तिकेयची संघर्षमय कहाणी; मजूर म्हणून केले काम, बिस्कुटासाठी पायी प्रवास, वर्षभर एकवेळचंच जेवण!

कुमार कार्तिकेय सिंग याने नुकतेच मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात त्याने प्रभावी कामगिीरीही करून दाखवली.

कुमार कार्तिकेय सिंग याने नुकतेच मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात त्याने प्रभावी कामगिीरीही करून दाखवली. कानपूर ते मुंबई इंडियन्स हा कुमार कार्तिकेयचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. गेली अनेक वर्ष तो घरच्यांनाही भेटलेला नाही.

15 वर्षांचा असताना कार्तिकेय याने कानपूरहून दिल्ली गाठली... येथील क्रिकेट अकादमीत त्याला खेळायचे होते. त्याचे वडिल Pradeshik Armed Constabulary येथे कॉन्स्टेबल होते आणि त्यांना कसंबसं तयार करून कार्तिकेय दिल्लीत आला. या आवडीचा घरच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार नाही, याची हमी त्याने वडीलांना दिली.

त्यानंतर येथील प्रशिक्षक संजय भारद्वाज यांना त्याने घरची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी त्याला मोफत प्रशिक्षण देण्यास मान्य केले. पण, इथे कार्तिकेयचा खडतर प्रवास संपला नाही. त्याला दिल्लीत उदरनिर्वाह चालवण्यासाठी हाताला काम हवे होते.

अकादमीपासून 80 किलोमीटर दूर गाझियाबाद येथे एका फॅक्टरीत त्याला मजूराचं काम मिळालं. रात्रपाळीचं काम केल्यानंतर तो चालत यायचा आणि त्यातून तो बिस्किटासाठी 10 रुपये कसेबसे वाचवायचा. भारद्वाज यांना याबाबत जेव्हा समजले तेव्हा त्यांनी त्याच्या राहण्याची व खाण्याची सोय केली.

''जेव्हा कार्तिकेयला कूकने लंच दिला, तेव्हा तो ढसाढसा रडू लागला. जवळपास वर्षभर त्याने लंच केलाच नव्हता,''असे भारद्वाज म्हणाले. भारद्वाज यांनी कार्तिकेयला मध्य प्रदेश येथे पाठवले. दिल्लीत त्याला संधी मिळणे अवघड होते. मध्य प्रदेशच्या शाहडोल क्रिकेट असोसिएसन येथील अकादमीत तो डिव्हिजन क्रिकेट खेळला आणि पहिल्या दोन वर्षांत 50 हून अधिक विकेट्स घेतल्या.