संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४४ सामन्यांमधून अनेक लहान मोठ्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामधील पाच उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धेत आपली विशेष छाप पाडली आहे. जाणून घेऊयात अशा खेळाडूंविषयी.
श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा १६ बळी घेऊन या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिकही नोंदवली होती.
पाकिस्तानचा लेगस्पिनप शादाब खान याने उपांत्य फेरीत ४ बळी टिपत ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळवले होते. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चार बळी टिपणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने स्पर्धेत ९ बळी टिपले.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत डेरेल मिचेलने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता. त्याने या लढतीत नाबाद ७२ धावा फटकावल्या होत्या. तसेच स्पर्धेत खेळताना त्याने एकूण सहा सामन्यात १९७ धावा फटकावल्या होत्या.
यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड याने त्याला झोडपून काढले असले तरी उर्वरित संपूर्ण स्पर्धेत त्याने भेदक मारा केला होता. त्याच्या गोलंदाजीमुळेच पाकिस्तानला भारताविरोधात विश्वचषकातील पहिला विजय मिळाला होता.
श्रीलंकेच्या संघाची टी-२० विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक झाली तरी युवा खेळाडू चरित असलंकाने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने १४७ च्या स्ट्राईक रेटने २३१ धावा जमवल्या.