टेस्ट क्रिकेटनं पाहिली 'या' खेळाडूंची कसोटी; फक्त एका सामन्यात मिळाली संधी

कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारात संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, असं सर्वच क्रिकेटपटूंना वाटतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होत नाही. अनेकांची मर्यादित षटकांमधील कामगिरी उत्तम असते. मात्र त्यांना कसोटीत छाप पाडता येत नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना फक्त एकाच कसोटी सामन्यात संधी मिळाली आहे.

अॅल्बी मॉर्केल: दक्षिण आफ्रिकेचा हा माजी लू खेळाडू 58 एकदिवसीय सामने खेळला. याशिवाय 51 टी-20 सामन्यांमध्ये त्यानं संघाचं नेतृत्त्व केलं. मॉर्केल आयपीएलमध्ये यशस्वी ठरला. मात्र कसोटीत त्याच्या नावावर अवघा एक सामना जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2009 मध्ये मॉर्केल कसोटी सामना खेळला होता.

आंद्रे रसेल: फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करुन सामने एकहाती फिरवण्याची क्षमता असणारा हा वेस्ट इंडिजचा खेळाडू फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध रसेल कसोटी सामना खेळला होता. रसेलनं 51 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

जेम्स फॉकनर: ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूनं 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. या सामन्यात त्यानं सहा फलंदाजांना बाद केलं. मात्र यानंतर त्याला कसोटीत संधी देण्यात आली नाही. फॉकनर ऑस्ट्रेलियाकडून 69 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळला आहे.

आर. विनय कुमार: भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमार 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात विनय कुमारची कामगिरी चांगली झाली नाही. त्यानं 13 षटकात 73 धावा देऊन एका फलंदाजांला बाद केलं. यानंतर विनय कुमारला कसोटीत संधी देण्यात आली नाही.