क्रिकेट बॉलनं सर्वात उंच कॅच घेण्याचा विक्रम मोडला गेला. थीमोथी शेनॉन जेबसीलन यानं ११९.८६ मीटर म्हणजे जवळपास ३९३.३ फुटांवरून वेगानं खाली येणारा चेंडू यशस्वीरित्या झेलून विश्वविक्रमाची नोंद केली.
विशेष बाब म्हणजे २०१९मध्ये जेबसीलननं हा रिकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी त्याचं बोट तुटलं होतं. त्यानंतर त्याला हॉस्पिटलवारी करावी लागली होती आणि काही काळ तो मैदानापासून दूर होता.
काही वर्षानंतर जेबसीलननं पुन्हा एकदा विकेट-किपर ग्लोव्ह्ज परिधान केले आणि विश्वविक्रम नोंदवण्याची तयारी दाखवली. यावेळेत यश त्याच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावले.
९ नोव्हेंबर २०२१मध्ये त्यानं स्थानिक क्रिकेट मैदानावर ड्रोनच्या सहाय्यानं क्रिकेट बॉल जवळपास ४०० फूट उंचावल नेला आणि तिथून खाली सोडला. वेगानं येणारा धोकादायक चेंडू झेलण्याचे धाडस करणे म्हणजे संकट ओढावून घेण्यासारखेच, पण जेबसीलननं हे आव्हान यशस्वीरित्या पेललं.
जेबसीलननं ३९३.३ फुटांवरून आलेला चेंडू टिपला. याआधी इंग्लंडच्या क्रिस्टन बौमगार्टनरनं २०१९मध्ये ३७४ फुटांवरून खाली आलेला चेंडू झेलून वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला होता.
जेबसीलनचा जन्म श्रीलंकेचा. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि एकट्या आईनं त्याचा सांभाळ केला. ''श्रीलंकेत उदरनिर्वाह करणे अवघड होते. जेव्हा मी ऑस्ट्रेलियात जाण्याच्या स्वप्नांबाबत लोकांना सांगायचो तेव्हा ते हसायचे, ''असे जेबसीलननं सांगितले
त्यानं २०१८मध्ये जमा केलेले सर्व पैसे सिडनीच्या विमान तिकिटावर खर्च केले आणि नशीबानं त्याला तिथे नोकरी लागली. तो श्रीलंकेतील अनाथ मुलांसाठी व विधवा महिलांसाठी येथून काही निधी जमा करून पाठवतो.