भारतीय संघाचा पाकिस्ताननं १० विकेट्सनं धुव्वा उडवल्यानंतर रविवारी न्यूझीलंडनं भारताला ८ विकेट्स आणि ३३ चेंडू राखून पराभूत केलं. यानंतर भारतीय संघावर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठीची दावेदारी सिद्ध करण्यासाठी भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा होता. पण भारताचा ८ विकेट्सनं पराभव झाला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पण फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं.
पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यात अख्तरनं संघावर जोरदार टीका केली आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी आधी या गोष्टीचा विचार करावा की त्यांना इन्स्टाग्रामवर क्रिकेट खेळायचं आहे की मैदानावर? असा खोचक टोला शोएब अख्तरनं लगावला आहे.
शोएब अख्तरसोबतच शाहिद आफ्रिदीनंही भारतीय संघावर निशाणा साधला. आता एखादा चमत्कारचं भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचवू शकतो, असं शाहिद आफ्रिदीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'न्यूझीलंडनं जर टॉस जिंकला तर भारतासाठी खूप कठीण होऊ शकतं असं मी आधीपासूनच सांगत होतो. तरीही भारत खूप वाईट पद्धतीनं खेळला. मला एकदाही असं वाटलं नाही की टीम इंडिया सामन्यात उजवी ठरली. खूप दबावात खेळत असल्याचं दिसून आलं. दोन संघ मैदानात खेळत आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. केवळ न्यूझीलंडचाच संघ दिसत होता. भारतानं ज्यापद्धतीनं खेळ केला ते पाहून मी खूप दु:खी आहे', असं शोएब अख्तर म्हणाला.
'भारतीय संघ नेमकं कशापद्धतीनं खेळत आहे तेच काही कळेनासं झालं आहे. तुम्ही टॉस हरलात म्हणून तुमचं काही आयुष्य संपलं नव्हतं. मला वाटतं टॉस झाल्यानंतरच टीम इंडियानं नांगी टाकली होती. बॅटिंग ऑर्डर बदलली, खराब शॉट सिलेक्शन, शमीला उशीरा गोलंदाजी देणं हे खूप भयानक होतं', असंही तो म्हणाला
'भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता अफगाणिस्तान विरुद्ध भारताचं काय होईल याचा मी विचार करु लागलो आहे. भारतीय खेळाडूंना आता याचा विचार करावा लागेल की त्यांना इंस्टाग्रामवर क्रिकेट खेळायचं आहे की मैदानात', असा खोचक टोला शोएब अख्तर यानं भारतीय संघाला लगावला आहे.
भारतीय संघ वर्ल्डकप खेळायला आला आहे असं वाटतच नाही. रोहित शर्माऐवजी इशान किशनला फलंदाजीला पाठवण्यामागे नेमका काय उद्देश होता? हार्दिक पंड्याला थोडं लवकर गोलंदाजी द्यायला हवी होती असंही शोएब अख्तरनं म्हटलं आहे.