'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 7600 झाला असून मृतांची संख्या 249 पर्यंत गेली आहे. आतापर्यंत 774 रुग्ण बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

देशातील कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू पुढे आले आहेत. प्रत्येकांनी आपापल्या परीनं आर्थिक मदत केली आहे. पण, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आर्थिक मदतीपर्यंत थांबला नाही.

कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी ईडन गार्डन खुलं केलं.

कोरोना व्हायरसच्या संकट काळात बंगाल टायगर गांगुलीनं लाखमोलाचं समाजकार्य सुरू ठेवलं आहे.

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीनं पंतप्रधान सहाय्यता निधीत 51 कोटी देण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि अशा गरजूंना पश्चिम बंगाल सरकार जेवण पुरवत आहे. सरकारच्या मदतीला गांगुली धावून गेला आणि त्यानं 50 लाख किमतीचे 2000 किलो तांदूळ गरजूंसाठी दान केले.

47 वर्षीय सौरव गांगुलींन त्यानंतर कोलकातातील ISKCON संस्थेला भेट देत त्यांना मदत केली. ISKCON दररोज 20000 लोकांना जेवण पुरवण्याचं समाजकार्य करते.

ज्यांचा हात पाकडून क्रिकेटचे धडे गिरवले त्या गुरूसाठी गांगुली धावला आहे. गांगुलीचे पहिले प्रशिक्षक अशोक मुस्तफी हे सध्या मृत्यूशी लढा देत आहेत. अशोक मुस्तफी यांना बंगालचे रमाकांत आचरेकर म्हणून ओळखले जातात. गांगुलीनं गुरूच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे.

देशातील शाळांमधील मुलभूत सुविधा सुधारण्यासाठीही गांगुली काम करत आहे. त्यानं 2015साली सपोर्ट माय स्कूल या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.