महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडले, तो क्षण याच दशकात चाहत्यांनी अनुभवला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या वन डे सामन्यापूर्वी तेंडुलकरला निवृत्ती घेण्यास भाग पाडले. दहा दिवसांनंतर तेंडुलकरने निवृत्ती घेतली. ''12 डिसेंबर 2012मध्ये सचिनशी आम्ही भेट घेतली आणि त्याला भविष्याबद्दल विचारले. त्याच्या डोक्यात निवृत्तीचा विचार नव्हता, परंतु निवड समितीनं पक्का निर्णय केला होता आणि त्याची माहिती बीसीसीआयला दिली गेली होती. सचिनलाही ते समजलं आणि त्यानं पुढच्या बैठकीपूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला,''अशी माहिती तेव्हाचे निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी 2016मध्ये ABP माझाला दिलेल्या मुलाखतीतून दिली. 2011 वर्ल्ड कपनंतर तेंडुलकर केवळ 10 वन डे सामने खेळला, त्यातही त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.