Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

कोरोना व्हायरमुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत किंवा त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांना तर जुन्या सामन्यांच्या हायलाईट्सवर समाधान मानावे लागत आहेत.

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल), आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे.

क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आजपासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेऊन चेंडू चमकावण्यासाठी लाळ न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सेंट व्हिंसेंट अँड ग्रेनाडीन्स क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. 22 ते 31 मे 2020 या कालावधीत विंसी प्रीमिअर लीग ( व्हिपीएल) T10 खेळवण्यात येणार आहे.

कॅरेबियन बेटावरील आर्नोस व्हॅली स्पोर्टिंग कॉम्प्लेक्सवर या T10 लीगचे सामने खेळवण्यात येतील. या लीगमध्ये 6 संघांचा समावेश असलेली ही लीग इंडियन प्रीमिअर लीग आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये 72 खेळाडूंचा सहभाग आहे.

क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरे शॅलोव यांनी सांगितले की,''क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या लीगच्या सामन्याला क्रिकेट चाहत्यांचा होणारा आवाज मला आतापासून ऐकू येत आहे. 10 दिवसांत 30 सामने खेळवण्यात येणार असून त्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.''

या लीगमध्ये केस्रिक विलियम्स, ओबेड मॅकॉय आणि सुनील अँब्रीस हे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत लीगचे सामने रंगणार आहेत. Dream11 या लीगचे पार्टनर असल्यामुळे त्याचे लाईव्ह स्कोअर तेथे पाहायला मिळेल.

संघ - बोटनिक गार्डन रेंजर्स, ग्रेनाडाईन डाव्हर्स, सॉल्ट पोंड ब्रेकर्स, ला सौफ्रीएर हायकर्स, डार्क व्ह्यू एक्स्पोरर आणि फोर्ट चार्लोट स्ट्रायकर्स

Read in English