Join us  

Virat Kohli Records, IND vs AFG: एकही मारा, पर 'सॉल्लिड' मारा... King Kohli च्या 'विराट' शतकाने केले १२ विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 2:04 AM

Open in App
1 / 15

Virat Kohli Records, IND vs AFG: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकले. विराटने ६१ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद १२२ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळेच भारताला अफगाणिस्तानपुढे २१३ धावांचे आव्हान देता आले.

2 / 15

अफगाणिस्तानला या आव्हानाचा पाठलाग करणे जड जाणार हे स्वाभाविकच होते. पण त्यातही भुवनेश्वर कुमारच्या स्विंग गोलंदाजीमुळे त्यांचं कंबरडं मोडून गेलं. भुवनेश्वर कुमारने केवळ ४ धावा देत ५ बळी टिपले. त्याला इतर गोलंदाजांचीही चांगली साथ लाभली.

3 / 15

विराट कोहलीच्या शतकाची प्रतिक्षा भारतीय चाहते गेली अडीच-तीन वर्षांपासून करत होते. अखेर विराटने आज दुष्काळ संपवून टाकला आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक साजरे केले. महत्त्वाची बाब म्हणजे या एका शतकाने विराटने तब्बल १२ पराक्रमांना गवसणी घातली.

4 / 15

१. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिलेवहिले शतक ठोकून मोठा पराक्रम केला. नाबाद १२२ धावांची खेळी करत विराट हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय ठरला. रोहित शर्माचा श्रीलंकेविरूद्धचा ११८ धावांचा विक्रम त्याने मोडीत काढला.

5 / 15

२. विराट कोहली टी२० मध्ये शतक ठोकून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक मारणारा भारतीय फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. असा पराक्रम करणारा विराट हा सुरेश रैना, रोहित शर्मा आणि लोकेश राहुलनंतर चौथा भारतीय ठरला.

6 / 15

३. आंततराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही विराटने पराक्रम रचला. विराट हा टी२० मध्ये शतक ठोकणारा सहावा भारतीय ठरला. या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी अशी कामगिरी केली आहे.

7 / 15

४. विराट कोहलीने आज ठोकलेले शतक हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक ठरले. त्यासोबतच विराटने आज ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता केवळ सचिन तेंडुलकरच त्याच्या पुढे (१०० शतके) आहे.

8 / 15

५. आंतरराष्ट्रीय टी२० आणि टी२० लीग स्पर्धा (IPL) मिळून एकूण सर्वाधिक शतके ठोकण्याचाही संयुक्त विक्रम विराट कोहलीने केला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यासह आता कोहलीचीही टी२० मध्ये ६ शतके आहेत.

9 / 15

६. विराटने कोहलीने बहुप्रतिक्षित शतक ठोकताना दिमाखात षटकार लगावला. विराटने आजच्या सामन्यात एकूण ६ षटकार खेचले. त्यासोबतच, टी२० मध्ये १०० षटकार लगावणारा तो रोहितनंतर केवळ दुसरा भारतीय तर जगभरात १०वा फलंदाज ठरला आहे.

10 / 15

७. विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकत धडाकेबाज कामगिरी केलीच. पण त्यासोबतच युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्व टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील ही सर्वाधिक वैयक्तिक खेळी (नाबाद १२२) ठरली.

11 / 15

८. विराट कोहलीने आजच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. विराटने आज टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार ५०० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणार तो जगात रोहित शर्मानंतर केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.

12 / 15

९. आजच्या शतकामुळे विराट कोहलीने टी२० मध्ये आपली छाप सोडलीच आहे. पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये मिळून त्याने आज २४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करत त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळवला. इतर भारतीयाला ते अद्याप जमलेले नाही.

13 / 15

१०. विराट कोहली आजच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडीत काढला. विराटने ५२२ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये २४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सचिनला हा टप्पा ओलांडण्यासाठी ५४० डाव खेळावे लागले होते.

14 / 15

११. आशिया चषक स्पर्धेच्या टी२० फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला. पूर्वी आशिया चषक स्पर्धा ही वन डे क्रिकेटमध्ये खेळवली जात होती. पण संघांचा व्यस्त कार्यक्रम पाहता, आता ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाते.

15 / 15

१२. विराटने आजच्या सामन्यात शतक झळकावत सामनावीराचा किताब पटकावला. त्यासोबतच एक खास योगायोग आणि विक्रम आज घडला. विराटने सर्वाधिक १३ वेळा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीराचा किताब पटकावला. या संयुक्त विक्रम अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीच्या नावावर आहे. अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराटने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीरोहित शर्मासचिन तेंडुलकर
Open in App