विराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 वर्ष पूर्ण केली. या 11 वर्षांच्या प्रवासात कोहलीनं कर्णधार म्हणून केलेल्या खास दहा विक्रमांवर जरा नजर टाकूया...

कोहलीनं 2008मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सलग तीन कॅलेंडर वर्षांत ( 2016 ते 2018) तीनवेळा 1000 धावा करणारा कोहली हा पहिला भारतीय आहे. या काळात त्यानं 14 शतकं ठोकली.

वन डे क्रिकेटमध्येही कॅलेंडर वर्षांत सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने 15 डावांत हा पल्ला गाठला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम नावावर करण्यापासून कोहली केवळ 7 शतकं दूर आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 49) अव्वल स्थानावर आहे.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम कोहलीनं केला आहे. त्यानं 205 डावांत हा पराक्रम केला. तेच तेंडुलकरला 259 डावांत हा पल्ला गाठता आला होता.

त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 222 डावांत 11000 धावांचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. याही वेळेस त्यानं तेंडुलकरचा ( 276 डाव ) विक्रम मोडला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे आणि आंरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये आठव्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या वार्षिक वैयक्तिक पुरस्कारावर सलग तीन वेळा नाव कोरणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही कोहलीच्या ( 5412 धावा) नावावर आहे. एका मोसमात सर्वाधिक 973 धावांचा विक्रम त्याने केला. 2016च्या मोसमात त्याने चार शतकं ठोकली होती.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या ( 2019) इतिहासात सलग पाच अर्धशतकं झळकावणारा तो पहिला कर्णधार आहे.