Join us  

Virat Kohli: अव्वल खेळाडू ते फ्लॉप कर्णधार; वाचा कोहलीच्या करिअरची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 2:22 PM

Open in App
1 / 9

विराट कोहली एक खेळाडू म्हणून नेहमीच उत्तम कामगिरी करत आला आहे. याशिवाय कर्णधारपदीही त्यानं चांगली कामगिरी केली. पण आयसीसी स्पर्धांमध्ये मोठ्या सामन्यांत कोहलीच्या कर्णधारपदाची चमक काही दिसू शकली नाही. कोहलीनं आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं आहे आणि यातील ३८ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला असून हा भारतासाठीचा एक विक्रम आहे.

2 / 9

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीनंतर भारताचा चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्त्व केलं आहे. यात ६५ सामन्यांमध्ये भारतानं विजयाची नोंद केली आहे. तसंच कोहलीनं आतापर्यंत ४९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं आहे.

3 / 9

३३ वर्षीय विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत कर्णधारपदी भारतासाठी ६५ सामन्यांमध्ये ५६.११ च्या सरासरीनं ५६६७ धावा केल्या आहेत. यात २० खणखणीत शतकं आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट विश्वात एमएस धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा भारताचा कर्णधार आहे.

4 / 9

कोहलीनं आतापर्यंत ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७२.६५ च्या सरासरीनं ५४४९ धावा केल्या आहेत. यात २१ शतकं आणि २७ अर्धशतकं कोहलीनं ठोकली आहेत. दुसरीकडे ट्वेन्टी-२० विश्वात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरोन फिंचनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा कर्णधार आहे. कोहलीनं संघाचा कर्णधार म्हणून ४९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत १५७० धावा केल्या आहेत.

5 / 9

आयसीसी स्पर्धांची जेव्हा वेळ येते तेव्हा कर्णधारपदाच्या बाबतीत विराट कोहली फ्लॉप ठरलेला दिसून आला आहे. २०१७ सालच्या चॅम्पियन्स करंडकाच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारतीय संघावर १८० धावांनी मात दिली होती. या सामन्यात कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्ताननं ५० षटकांमध्ये दमदार फलंदाजी करत ३३८ धावांचा डोंगर उभारला होता.

6 / 9

२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये भारतानं पुन्हा एकदा दमदार कामगिरीची नोंद करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं होतं. न्यूझीलंड विरुद्ध भारताचा उपांत्य फेरीत १८ धावांनी पराभव झाला होता.

7 / 9

कसोटी क्रिकेट विश्वात भारतीय संघाची अव्वल दर्जाची कामगिरी पाहता आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये कोहली स्पर्धेचे जेतेपद प्राप्त करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण साउथॅम्प्टनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा कोहली ब्रिगेड फ्लॉप ठरली आणि न्यूझीलंडनं ८ विकेट्सनं मात करत चॅम्पियनशीप जिंकली.

8 / 9

दुसरीकडे आयपीएलमध्ये बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचं नेतृत्त्व विराट कोहली करत होता. पण आजवर एकदाही बंगलोरला स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे आयपीएलमध्येही कोहलीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय यंदाच्या आयपीएलमध्ये जाहीर केला.

9 / 9

सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्येही भारतच प्रबळ दावेदार मानला जात होता. पण पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये कोहलीला नाणेफेक जिंकता आली नाही. टॉस आणि कोहली यांचा नेहमी ३६ चाच आकडा राहिला आहे.

टॅग्स :विराट कोहलीटी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App