विराट कोहलीच्या फिटनेसचं श्रेय दीपिकाला; कसं ते तुम्हीच वाचा!

जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आघाडीवर आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी विराट किती मेहनत घेतो हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे अनेक तरुण त्याला तंदुरुस्तीच्या बाबतीत आदर्श मानतात.

क्रिकेटमध्ये आपले स्थान टिकवून ठेवायचे आहे, तर सातत्यपूर्ण कामगिरीबरोबच तंदुरुस्तीही गरजेची आहे. याची चांगली जाण विराटला आहे.

टीम इंडियात स्थान पटकावण्यासाठी आता खेळाडूंना Yo-Yo चाचणी देणं अनिवार्य आहे. यात नापास झालेल्या खेळाडूला संघात स्थान नाही. त्यामुळेच विराटसह संघातील सर्व खेळाडू आता तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत आहेत.

पण, विराटच्या या तंदुरुस्ती मागे आणखी एक कारण आहे. त्याला तंदुरुस्तीची प्रेरणा कोणाकडून मिळाली? याचे उत्तर शोधल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

तंदुरुस्त राहण्यासाठी विराटनं नॉन व्हेज जेवणाचा त्याग केला, हे सर्वांनाच माहित आहे. पण, त्याच्या या तंदुरुस्तीमागे एक वेगळीच व्यक्ती आहे आणि टीम इंडियाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांनी हे गुपित उघड केले आहे.

भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकची पत्नी आणि भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलमुळे कोहलीला कसून सराव करण्याची प्रेरणा मिळाली.

बासू यांनी सांगितले की,''पहिले दोन-तीन वर्ष आम्ही इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान कसून सराव करायचो. पण, जेव्हा दीपिका पल्लीकलचा सराव त्यानं पाहिला, तेव्हापासून त्याला कसून सराव करण्याची प्रेरणा मिळाली. वैयक्तिक खेळातील खेळाडू कशाप्रकारे सराव करतात हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली. त्यानंतर त्यानं त्यांच्यासारखा सराव करण्याचा निर्णय घेतला.''

विराटच्या फिटनेसचं श्रेय दीपिकाला दिले तर चुकीचे ठरणार नाही.