ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली सतत चर्चेचा विषय असतो. पण याचे कारण त्याची चमकदार कामगिरी नसून वाद आणि इतर नकारात्मक बाबी आहेत.
मेलबर्न कसोटीदरम्यान त्याच्याबाबत मैदानावरील आक्रमक वर्तनामुळे गदारोळ झाला होता. आधी त्याचे ऑस्ट्रेलियन रिपोर्टरशी भांडण झाले. त्यानंतर मैदानावर त्याने १९ वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला धक्का दिला.
यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याला टार्गेट केले आणि ICC नेही कारवाई केली. या घटना पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अरॉन फिंच याने धक्कादायक दावा केला आहे. विराट जाणीवपूर्वक भांडणं करतोय, असा मोठा दावा त्याने केलाय.
फिंच म्हणाला, 'विराट हा असा खेळाडू आहे ज्याने दबावात नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सध्या त्याच्याकडे पाहून असे वाटते की, तो मुद्दामच अशा प्रकारची भांडणं करतोय आणि रोष ओढवून घेतोय.'
'आतापर्यंतचा इतिहास असं सांगतो की ज्या-ज्या वेळी विराटवर सडकून टीका करण्यात आली आहे किंवा दबाव आला आहे, तेव्हा त्याने चांगला कमबॅक केला आहे. त्यामुळे तो असं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहे.'
मेलबर्न कसोटी दरम्यान सॅम कॉन्स्टाससोबत झालेल्या भांडणानंतर आणि ऑस्ट्रेलियन मीडियाच्या टीकेनंतर कोहली चांगला खेळ करताना आणि जुन्या स्टाईलमध्ये शिस्तबद्ध फलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे विराट कदाचित शेवटच्या सामन्यात चांगला खेळेल असाही अंदाज आहे.