Virat Kohli Rohit Sharma, Pakistan: "विराट कोहलीमध्ये हिंमत होती, रोहित शर्माची अवस्था वर्षभरातच अशी झालीय की..."; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने Team India ला डिवचलं, काय म्हणाला पाहा

पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाची भारतीय क्रिकेटप्रेमींना नक्कीच चीड येईल..

Virat Kohli Rohit Sharma, Babar Azam Pakistan: सध्या पाकिस्तान क्रिकेट संघात कर्णधार बाबर आझमवरून बराच गोंधळ सुरू आहे. घरच्या मैदानावर सातत्याने सर्व मालिका गमावणाऱ्या पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदावर विचारमंथनाला वेग आला आहे. पाकिस्तान संघात स्प्लिट कॅप्टन्सी (प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार) असावा यावर अनेक दिग्गजांचे एकमत आहे.

कामरान अकमलने माजी पाकिस्तानी सलामीवीर सलमान बटसोबत एक व्हिडिओ चॅट केले. या गप्पांमध्ये हाफिज मोहम्मद इम्रान, माजी क्रिकेटपटू सलमान कादिरही उपस्थित होते. हा व्हिडिओ चॅट यूट्यूबवरही शेअर करण्यात आला.

पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलने याच मुद्द्यावर भाष्य करताना रनमशिन विराट कोहली याच्याबद्दल कौतुकाद्गार काढले. पण त्याच वेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत मात्र एक मोठे विधान केले, ज्याचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना नक्कीच राग येऊ शकतो.

या व्हिडिओमध्ये सलमान बटने पाकिस्तान संघाचा प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार असावा की तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असावा असा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर कामरान अकमलने आपले मत मांडले आणि सांगितले की, कर्णधारपदाच्या मुद्द्याशी छेडछाड करण्याची ही वेळ नाही, कारण वन डे वर्ल्ड काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

कामरान अकमल यावेळी कर्णधारपदाच्या दडपणाबद्दल बोलला. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या कर्णधार म्हणून असलेल्या कामगिरी बद्दल त्याने भाष्य केले. "कोहलीने पाच वर्षे कर्णधारपदाचा दबाव कसा सहन केला हे माहीत नाही. विराट कोहलीत हिंमत आहे, त्याने तब्बल पाच वर्ष ते पद सांभाळलं."

"रोहितची वर्षभरातच काय अवस्था झाली बघा. त्याची प्रकृती बिघडली. त्याला एक वर्षही उलटले नाही आणि त्याची 'हालत खराब' झालीय. टॉस उडवल्यानंतर फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे पण त्याला आठवत नाही. त्याने त्याच्यावरचा दबाव थोडा कमी केला पाहिजे," असे हसत हसत कामरान अकमल म्हणाला.