रॉस टेलरला कुणी मारलं? सध्या हा प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर ( Ross Taylor) याने इंडियन प्रीमिअर लीग २०११च्या पर्वात राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) मालकाने माझ्या कानाखाली वाजवली होती, असा खळबळजनक दावा केला.
२०११मध्ये RR कडून खेळणारा टेलर शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर संघ मालकाने तुला शून्यावर बाद होण्यासाठी पैसे देत नाही, असे विधान करून कानाखाली वाजवली, असा दावा किवी खेळाडूने केला. त्यानंतर RR मालक म्हणजे राज कुंद्रा ( Raj Kundra) यांनी हे कृत्य केले की काय? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. राजस्थान रॉयल्सने या मुद्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याचा पवित्रा घेतलेला आहे.
राजस्थान रॉयल्सने २००८च्या पहिल्या पर्वाचे जेतेपद पटकावले. जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेल लिमिटेल या कंपनीच्या नावाखाली राजस्थानची फ्रँचायझी खरेदी करण्यात आली. Tresco International Limited या कंपनीने RRचे सर्वाधिक शेअर विकत घेतले आहेत. सुरेच चेलाराम आणि कुटुंबियांची ही कंपनी आहे आणि त्यांच्याकडे ४५ टक्के शेअर आहेत. लाचलन मुर्डोच यांच्याकडे ११.७ टक्के आणि इमर्जिंग मीडियाकडे ३२.४ टक्के शेअर आहेत, तर राज कुंद्रा यांच्याडे ११.७ टक्के शेअर आहेत.
२०१५ पर्यंत कुंद्रा या संघासोबत होते आणि टेलरने सांगितलेला किस्सा हा २०११चा आहे. तेव्हा कुंद्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे RRचा चेहरा होते. २०११-१२ मध्ये कुंद्रा व शिल्पा या दोघांव्यतिरिक्त एकाही मालकांनी संघासोबत प्रवास केला नाही. त्यामुळे टेलर ज्या मालकाचा उल्लेख करतोय, ते कुंद्रा असण्याचा शक्यता नाकारता येत नाही. २०१५नंतर कुंद्रा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या RM लोढा समितीने बंदी घातली आणि राजस्थान रॉयल्सलाही दोन वर्षांसाठी निलंबित केले.
जेव्हा तुमच्यावर प्रचंड पैसा गुंतवला जातो, तेव्हा तुम्हीही स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असता आणि ज्यांनी पैसा लावला आहे त्यांच्या अपेक्षाही अधिक असतात. हे व्यावसायिक आहे. राजस्थान आणि पंजाब किंग्स यांच्यात मोहाली येथे सामना होता. १९५ धावांचा पाठलाग करताना मी शून्यावर LBW झालो आणि आम्हाला तो सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर जेव्हा आम्ही, सपोर्ट स्टाफ व संघ व्यवस्थापन हॉटेलच्या बारमध्ये होते. तेव्हा तेथे लिझ हर्ली व शेन वॉर्नही होते. RRचा एक मालक माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, शून्यावर बाद होण्यासाठी आम्ही तुला पैसे देत नाही. त्याने मला ३-४ वेळा कानाखाली वाजवली. त्यानंतर तो हसू लागला, त्याने जोरात मारलेले नव्हते, परंतु मला आश्चर्य वाटले. पण, व्यावसायिक खेळात असेही घडू शकते, याची कल्पना कधी केली नव्हती.