Pak T20 World Cup : गाढवालाही बाप बनवायचं असतं; शोएब मलिकच नाव घेत वसीम अक्रमचं वक्तव्य

131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला.

Wasim Akram on Pakistan Team: टी-20 विश्वचषकात पर्थच्या स्टेडियमवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (PAK vs ZIM) यांच्यात सामना पार पडला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला 131 धावांचे आव्हानात्मक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने घेतलेल्या 4 विकेटमुळे झिम्बाब्बेच्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. मात्र 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. अखेर झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवून इतिहास रचला. 

याचदरम्यान पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी संघाची शाळा घेतली. एका लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये शोएब मलिकची निवड न होण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं.

प्लॅनिंगबद्दल ज्याप्रकारे चर्चा झाली, त्याबाबत सर्वांना एकत्र बसावं लागेल. पाकिस्तानी संघाची मीडल ऑर्डर कमकुवत असल्याचं आम्ही एका वर्षापासून सांगत आहोत. इथे एक जो बसला आहे, शोएब मलिक, मी कर्णधार असतो तर माझं ध्येय काय असतं? काहीही करून वर्ल्ड कप जिंकणं आणि त्यासाठी मला गाढवालाही बाप बनवायला लागलं असतं तरी मी बनवलं असतं असं वसिम अक्रमनं ए स्पोर्ट्स वरील एका कार्यक्रमात म्हटलं.

माझं आपलं टार्गेट आहे. मला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. जर मला संघात शोएब मलिक हवा असेल तर मी निवड समितीशी भिडलो असतो. मला मलिक हवा आहे, अन्यथा मी कर्णधार म्हणून खेळणार नाही, असंही त्यानं स्पष्ट केलं.

यादरम्यान वसीम अक्रमनं बाबर आझमलाही सल्ला दिला. त्याला डोक्यानं खेळावं लागेल. ही गल्लीतील टीम नाही की माझ्या ओळखीचे किंवा माझे मित्र संघात सामील व्हावे. मी जर कर्णधार असतो तर शोएब मलिकला मीडल ऑर्डरमध्ये खेळवलं असतं. हे सामने ऑस्ट्रेलियात आहेत. शारजा किंवा दुबई, पाकिस्तानात हे सामने नसल्याचंही त्यानं म्हटलं.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली.

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (14), कर्णधार बाबर आझम (4), शान मसूद (44), इफ्तिखार अहमद (5), शादाब खान (17) आणि हैदर अली (0) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.