Join us

वेस्ट इंडिजने 5 वर्षांत प्रथमच इंग्लंडला नमवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:28 IST

Open in App
1 / 8

वेस्ट इंडिजने दुसऱ्या वन डे सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर 26 धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. शिमरॉन हेयमायरच्या 104 धावा आणि शेल्डन कॉटरेलच्या पाच विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजने हा विजय मिळवला. 2014नंतर वेस्ट इंडिजने प्रथमच इंग्लंडला वन डे सामन्यात पराभूत करण्याचा पराक्रम केला.

2 / 8

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेल व जॉन कॅम्पबेल यांनी विंडीजला 61 धावांची सलामी दिली. कॅम्पबेल 23 आणि गेलने 50 धावा केल्या.

3 / 8

गेलचे कारकिर्दीतील हे 50वे अर्धशतक ठरले. अर्धशतकाचे अर्धशतक साजरा करणारा गेल जगातील 17वा आणि विंडीजचा तिसरा खेळाडू ठरला. गेलच्या आधी ब्रायन लारा ( 63) आणि डेसमंड हायनेस ( 57) यांनी हा पल्ला सर केला.

4 / 8

3 बाद 121 अशा अवस्थेत असताना शिमरॉन हेटमायरने संघाचा डाव सावरला. त्याने डॅरेन ब्राव्होसह चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. हेटमारने नाबाद 104 धावा करताना संघाला 289 धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरचे हे चौथे वन डे शतक ठरले.

5 / 8

290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 10 धावांवर त्यांचे दोनही सलामीवीर माघारी परतले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली.

6 / 8

त्यानंतर मॉर्गनने चौथ्या विकेटसाठी बेन स्टोक्ससह 99 धावा जोडल्या. मॉर्गन 70 धावांवर माघारी परतला. त्याचे हे 43 वे अर्धशतक ठरले. स्टोक्सने ( 79) 14वे अर्धशतक झळकावले.

7 / 8

40 व्या षटकात स्टोक्स माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. त्यांना 263 धावांपर्यंतच मजल मारता आली. कॉटरेलने पाच, तर कर्णधार जेसन होल्डरने तीन विकेट घेतल्या.

8 / 8

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज : 6 बाद 289 धावा ( शिमरॉन हेटमायर नाबाद 104, ख्रिस गेल 50; आदिल रशीद 1/28) वि. वि. इंग्लंड : 47.4 षटकांत सर्वबाद 263 ( बेन स्टोक्स 79, इयॉन मॉर्गन 70; शेल्डन कॉटरेल 5/46).

टॅग्स :वेस्ट इंडिजख्रिस गेलइंग्लंड