Kieron Pollard IPL: गुन्हेगारीचे जग ते क्रिकेटचा बादशाह! जाणून घ्या 'मुंबई'च्या कायरन पोलार्डचा संघर्षमय प्रवास

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड सध्या चर्चेत आहे. पोलार्डने मंगळवारी मोठा निर्णय घेत आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कायरन पोलार्डचे बालपण अत्यंत गरिबी आणि संघर्षात गेले. कायरन पोलार्डला त्याच्या कुटुंबात त्याच्या एकट्या आईसह (लग्नाच्या आधी) 2 लहान बहिणी होत्या.

कायरन पोलार्डचे बालपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या संघर्षाने भरलेले होते. एका मुलाखतीदरम्यान पोलार्ड म्हणाला होता की, क्रिकेटमध्ये यश मिळवण्यापूर्वी त्याने अत्यंत गरिबीचे दिवस पाहिले होते. सकाळचे जेवण जेवत असताना पोलार्ड आणि त्याच्या कुटुंबीयांना संध्याकाळी भाकरी मिळेल की नाही याची देखील खात्री नव्हती.

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्डच्या आयुष्यात मानसिक संघर्षाचा काळ सुरू झाला, जेव्हा त्याची आई नोकरीच्या शोधात त्रिनिदाद शहरात गेली. पोलार्डचे बालपण ज्या टॅकारिगुआ भागात गेले ते त्या वेळी गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडीवर होते. खून, दरोडा, ड्रग्ज, गांजा असे गुन्हे येथे रोज घडत होते.

अशा परिस्थितीत राहून देखील पोलार्डने हिंमत हारली नाही आणि मेहनत करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. पोलार्डने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "माझे लक्ष कधीच विचलित झाले नाही आणि मी वयाच्या १५व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली." अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या पोलार्डने अवघ्या जगाला आपली ओळख पटवून दिली.

कायरन पोलार्डने मंगळवारी आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मुंबई इंडियन्सच्या संघाचा प्रमुख हिस्सा राहिलेल्या पोलार्डने एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांना संदेश दिला. "मला आणखी काही वर्षे खेळायचे असल्याने हा निर्णय सोपा नव्हता, पण मुंबई इंडियन्सशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या आयपीएल कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहिती आहे की या अविश्वसनीय फ्रँचायझीने मला खूप मिळवून दिले आहे." पोलार्डने भावनिक पोस्ट करून आपल्या निवृत्तीवर स्पष्टीकरण दिले.

"मला मुंबईच्या फ्रँचायझीने खूप काही दिले आहे, त्यामुळे मी यापुढे मुंबईसाठी खेळलो नाहीतर मी मी स्वतःला MI विरुद्ध खेळताना पाहू शकत नाही. हा MI ला भावनिक निरोप नाही. कारण मी आयपीएलमध्ये फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यासह एमआय एमिरेट्ससोबत खेळण्यास सहमती दर्शवली आहे. माझ्या कारकिर्दीतील हा पुढचा अध्याय खरोखरच रोमांचक आहे आणि मला स्वतःला खेळण्यापासून कोचिंगमध्ये बदलण्याची परवानगी देत आहे."

खरं तर मी मुंबई इंडियन्सच्या विरोधात खेळू शकत नाही असे कायरन पोलार्डने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. मात्र कायरन पोलार्डने ही यादी जाहीर होण्याच्या आधीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघासोबत १३ वर्ष खेळायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. पण आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून २०११ व २०१३ ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले. असे म्हणत कायरन पोलार्डने मुंबईच्या संघातून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली.