नितीशकुमार रेड्डी अन् 'विरुष्का'सोबत त्यानं लांबून काढलेल्या जुन्या सेल्फी मागची गोष्ट

नितीशकुमार रेड्डी किंग कोहलीचा जबरा फॅन आहे.

२१ वर्षीय नितीशकुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कसोटी ग्राउंडवर रंगलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळीनं आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवून दिली.

युवा पोरानं MCG च्या मैदानात अनेक विक्रम मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या खेळीला कोहलीनंही खास दाद दिली. नितीशकुमार रेड्डीसाठी ही गोष्ट खूप खास आहे. कारण तो विराट कोहलीला आपला आदर्श मानतो.

ज्या विराट कोहलीचा तो जबरा फॅन आहे त्याच्याकडून नितीशकुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी कॅप मिळाली होती. एवढेच नाही तर तो किंग कोहलीबरोबर बॅटिंग करतानाही दिसला.

ज्या कोहलीनं त्याच्या सेंच्युरीवर ड्रेसिंग रूमध्ये उभारून टाळ्या वाजवल्या त्याच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी कधीकाळी नितीश कुमारला खूप कसरत करावी लागली होती. कोहलीवरील प्रेम आणि त्याच्यासोबत फ्रेममध्ये दिसण्याची स्टोरी खूपच खास आहे. नितीश कुमारनं आपल्या आदर्श खेळाडूसोबत लांबून सेल्फी क्लिक करण्याची शक्कल लढवली होती.

सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या स्वीट कपलनं हजेरी लावली होती. त्यावेळी नितीश कुमारनं लांबूनच किंग कोहलीसोबत सेल्फी काढला होता.

बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्कानं नितीश कुमारला त्यावेळी सेल्फी दिली होती. पण विराटसोबत जवळून फोटो काढणं त्याला शक्य झालं नव्हते.

विराटच्या प्रेमापोटी तो फ्रेममध्ये दिसेल या हिशोबानं नितीशकुमारनं त्यावेळी काही खास फोटो क्लिक करून ठेवले होते.

नितीशकुमार रेड्डीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुनही या जुन्या आठवणी जतन करून ठेवल्याचे दिसते.

क्रिकेट खेळायला सुरु केल्यावर कोहलीसोबत खेळायला मिळेल का? याचं तो कॅलक्युलेशन करायचा. टीम इंडियात येईपर्यंत विराट कोहली निवृत्त होणार नाही ना! असे विचार त्याच्या मनात यायचे. जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर २१ व्या वर्षी टीम इंडियात एन्ट्री करत त्याने विराटसोबत प्रॉपर फ्रेममध्ये येण्याच स्वप्न साकार केलं.