IPL खेळताना तुमचं वर्कलोड मॅनेजमेंट कुठे जातं? सुनील गावस्कर यांनी खेळाडूंना फटकारलं

विराट कोहली, सूर्यकुमार यादव वगळता भारताच्या अन्य खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली.

 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघातील सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. विराट कोहली, सूर्यकुमार यादव वगळता भारताच्या अन्य खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल यांचे अपयश हे भारतासाठी खऱ्या अर्थाने मारक ठरले. त्यामुळेच आता संघातील काही सीनियर्स खेळाडूंना ट्वेंटी-२० सामन्यांपासून दूर ठेवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. असे असताना आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्या कामगिरीचाही लेखाजोखा मागवण्यात आला आहे. त्यांना आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय झाला आहे.

दरम्यान, सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून १० विकेट्सनं पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीदेखील वर्कलोड मॅनेजमेंटवरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर टीकेचा बाण सोडला. तसंच आयपीएल खेळताना वर्कलोड मॅनेजमेंट कुठे जातं? असा सवालही केला.

बदल होतील, जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही, तेव्हा बदल होतीलच. न्यूझीलंडला जाणाऱ्या संघात बदल झाल्याचे आपण पाहिले आहे. ही वर्कलोड-वर्कलोड मॅनेजमेंटची चर्चा सुरू आहे, कीर्ती आणि मदन यांनी अगदी बरोबर सांगितले की हे फक्त भारतासाठीच खेळण्याच्या नावावर होतं, असं सुनील गावस्कर म्हणाले.

तुम्ही आयपीएल खेळता, त्याचा पूर्ण सीजन खेळता. तुम्ही त्यासाठी प्रवासही करता. यापूर्वीचा आयपीएल सीजन केवळ चार मैदानांवर झाला. परंतु बाकीसाठी तर तुम्हाला प्रवास करावाच लागतो. तेव्हा थकायला होत नाही? त्यावेळी वर्कलोड होत नाही? केवळ भारतासाठी खेळायचं असेल तरच वर्कलोड होतो. तोही तेव्हा जेव्हा तुम्ही नॉन ग्लॅमरस देशांच्या दौऱ्यावर जाता. तेव्हाच तुम्हाला वर्कलोड जाणवतो? असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना फटकारलं.

भारताने २०१३मध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आलेले आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्याविरुद्धच्या घरच्या मालिकेतही भारत जिंकला. पण, आशिया चषकाच्या साखळी फेरीतील अपयशानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही.

आता भारतीय संघ १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे आणि त्यासाठी राहुल द्रविडला विश्रांती दिली गेली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष VVS Laxman हा भारतीय संघासोबत न्यूझीलंडला मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार असल्याची माहिती समोर येतेय. द्रविडच्या अनुपस्थितीत याआधीही लक्ष्मणने ही जबाबदारी सांभाळली आहे. द्रविड मायदेशासाठी रवाना झाला असून बांगलादेश दौऱ्यावर तो पुन्हा भारतीय संघासोबत असेल.