२ मुलांचा बाप, बॉडिगार्डची नोकरी सोडून क्रिकेटपटू झाला अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात चमकला

Who is Shamar Joseph? क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने बॉडिगार्डची नोकरी सोडली... त्याच्या या निर्णयानंतर घरखर्च कसा भागणार हा प्रश्न पडला होता आणि घरचे चिंतित झालेले... पण, त्याने त्यांना विश्वासात घेतले आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणात तो विश्वात सार्थ ठरवला..

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १८८ धावांत आटोपला. १३३ धावांवर ९ विकेट पडल्यानंतर केमार रोच आणि नवोदित शामर जोसेफ यांनी अखेरच्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. जोसेफने ११व्या क्रमांकावर येऊन ३६ धावांचे योगदान दिले.

याच २५ वर्षीय जोसेफने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर बनला आहे. पण तो पहिल्याच परीक्षेत नापास झाला. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर स्मिथला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्मिथच्या बॅटची कड घेऊन तिसऱ्या स्लिपच्या हातात गेला.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा जोसेफ हा टायरेल जॉन्सन यांच्यानंतर दुसरा विंडीज गोलंदाज ठरला. जॉन्सनने १९३९ मध्ये इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. कसोटीत एकून पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जोसेफ २३ वा खेळाडू आहे.

जोसेफने दुसरी विकेट घेताना मार्नस लाबुशेनला ( १०) माघारी पाठवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २ बाद ५९ धावा केल्या आहेत आणि ते १२९ धावांनी पिछाडीवर आहेत. जोसेफने ६ षटकांत १८ धावा देताना २ विकेट्स घेतल्या.

शामर जोसेफसाठी क्रिकेटर बनणे सोपे नव्हते. तो दोन मुलांचा बाप असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पहारेकरी म्हणून काम करत असे. पण त्याला नेहमीच क्रिकेटपटू व्हायचे होते.

क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने एक दिवस नोकरी सोडली. त्याचे व्यावसायिक पदार्पण वयाच्या २३ व्या वर्षी झाले. आता वर्षभरातच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला आहे.

शामर जोसेफ हे गयानामधील बारकारा नावाच्या गावातील आहेत, जिथे जाण्यासाठी कांगे नदीवर सुमारे २२५ किमी बोटीतून प्रवास करावा लागतो. दाट झाडीमुळे प्रवासाला दोन दिवस लागू शकतात.

त्यांच्या गावात एकच प्राथमिक शाळा आहे. तेथे माध्यमिक शाळेचीही सोय नाही. २०१८ पर्यंत तेथे टेलिफोन आणि नेटवर्कची सुविधा नव्हती. या सर्व आव्हानांना न जुमानता शामर जोसेफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला आहे.