Who is Vyshak Vijaykumar? रिप्लेसमेंट म्हणून आला, पहिलाच सामना गाजवला! १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडणारा विजय कुमार वैशाख ठरणार 'सुपर स्टार'!

IPL 2023, RCB beat DC by 23 runs : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावरील दुसऱ्या विजयाची नोंद करताना दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी नमवले. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC चा संघ ९ बाद १५१ धावाच करू शकला.

विराट कोहलीचे अर्धशतकानंतर RCBकडून पदार्पण करणाऱ्या विजयकुमार वैशाखने ही मॅच गाजवली. पदार्पणातच त्याने ४-०-२०-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. त्याने डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल या तगड्या फलंदाजांची विकेट घेताना RCBच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

आयपीएल २०२३ ला सुरुवात होण्यापूर्वी RCBला मोठा धक्का बसला आणि त्यांचा स्टार फलंदाज रजत पाटीदार हा स्पर्धेबाहेर गेला. त्याची रिप्लेसमेंट म्हणून RCBने नेट बॉलर विजय कुमार वैशाखला संघात घेतले. २६ वर्षीय गोलंदाजाला RCBचा माजी गोलंदाज अभिमन्य मिथून याचे मार्गदर्शन लाभले आहे.

१४० किमी वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आणि उत्तम यॉर्कर व नकलबॉल फेकण्याच्या शैलीने त्याने प्रभावित केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटककडून खेळतो. डेथ ओव्हर्समध्ये तो खूप किफायतशीर ठरतो.

वैशाख विजय कुमार कर्नाटककडून विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38 बळी घेतले आहेत. तर लिस्ट ए मध्ये त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. त्याने 14 टी-20 सामनेही खेळले असून त्यात 22 विकेट घेतल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, त्याने 10 सामन्यांत 6.31 च्या प्रभावी अर्थव्यवस्थेसह 15 बळी घेतले आहेत. आरसीबी संघाने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले. आता त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करायला आवडेल.

पदार्पणात RCBकडून उल्लेखनीय गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये वैशाखने चौथे स्थान पटकावले. सॅम्युएल बद्रीने २०१७मध्ये ९ धावांत ४ ( वि. मुंबई इंडिय़न्स), २०१५मध्ये डेव्हिड विसेने ३३ धावांत ४ ( वि. मुंबई) आणि २०२० मध्ये ख्रिस मॉरिसने १९ धावांत ३ ( वि. चेन्नई सुपर किंग्स) अशी RCBकडून पदार्पणात चांगली गोलंदाजी केली होती. पण भारतीय गोलंदाजांमध्ये तो वरचढ ठरला, त्याने आर पी सिंगचा ( ३-२७ वि. हैदराबाद, २०१३) विक्रम मोडला.