न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयकडून लवकरच होणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीकडून काही नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काही खेळाडूंनी लक्षवेधा कामगिरी केली होती. त्यामुळे अशा खेळाडूंना यावेळी निवड समितीकडून संधी देऊ शकते. असे खेळाडू पुढीलप्रमाणे
दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खानवर निवड समितीची नजर असेल. त्याने या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी जबदरस्त गोलंदाजी करून संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवले होते. आवेशने १६ सामन्यांमध्ये २४ विकेट घेतले होते. तसेच मुश्ताक अली स्पर्धेतील त्याची कामगिरीही निवड समितीला प्रभावित करणारी झाली आहे.
व्यंकटेश अय्यरने यावर्षी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने केकेआरकडून १० सामने खेळले. त्यामध्ये त्याने १२८.४७ च्या स्ट्राईक रेटने ३७० धावा जमवल्या होत्या. तसेच व्यंकटेश अय्यर हा त्याच्या जबरदस्त टायमिंगसाठी ओळखला जातो.
यंदाच्या आयपीएलमध्ये ज्या गोलंदजाचा बोलबाला दिसून आला तो गोलंदाज म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल. त्याने २०२१ च्या हंगामात सर्वाधिक बळी टिपले होते. त्याने १५ सामन्यांत मिळून ३२ विकेट घेतले होते. तसेच तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी अनकॅप्ड खेळाडू बनला होता.
केकेआरचा राहुल त्रिपाठी आयपीएलमधील एक चर्चित नाव आहे. त्याने २०१७ मध्ये पुण्याच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर राजस्थान आणि कोलकात्याच्या संघाकडून तो खेळला. दरम्यान यंदाच्या हंगामात त्रिपाठीने १७ सामन्यात ३९७ धावा चोपल्या. अशा परिस्थितीत निवड समितीक़डून त्यालाही संधी मिळू शकते.
जम्मूचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याने सनरायझर्सकडून पदार्पण करताना आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने १५० किमी प्रतितास वेगाने काही चेंडू टाकले होते. त्यानंतरच्या सामन्यात त्याचा वेग १५२.९५ पर्यंत पोहोचला होता. त्याने तीन सामन्यात दोन बळी घेटले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्यालाही संधी मिळू शकते.