T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली

shreyanka patil photo : भारतीय संघाची ट्वेंटी-२० विश्वचषकात खराब कामगिरी.

भारताच्या महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकली नाही.

२०१६ नंतर प्रथमच भारतीय संघाला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर त्यांना सर्वच स्तरातून ट्रोल केले जात आहे.

खरे तर टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून आणखीच प्रसिद्धी मिळाली. भारताला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई संघांविरुद्ध टीम इंडियाने विजय संपादन केला मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. भारत असलेल्या गटातून अखेर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली.

भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलने आपली व्यथा मांडताना चुकीची कबुली दिली. तसेच विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप कायम असल्याचे तिने सांगितले.

श्रेयांका पाटीलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपली व्यथा मांडली. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही जे काही करायला गेलो होतो त्यात आम्ही कमी पडलो... याचे आम्हाला खूप दु:ख वाटते.

तसेच तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम, केलेली टीका आणि कौतुकाबद्दल सर्वांचे आभार. आगामी काळात आम्ही अधिक कठोर परिश्रम करू. जोरदार पुनरागमन करू, भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न कायम आहे, असे तिने अधिक नमूद केले.