"ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना झाली तशी मदत होईल", स्मृती मानधनाने सांगितला महिला IPLचा फायदा

Smriti Mandhana, women ipl 2023: महिला आयपीएल आपल्या पदार्पणाच्या हंगामाकडे कूच करत आहे.

भारताच्या महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने महिला आयपीएलचा खूप फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. महिला आयपीएल भारतीय संघाचा पाया मजबूत करेल. तसेच या आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना हाय प्रेशर सामना खेळताना खूप मदत होईल असेही तिने म्हटले.

खरं तर महिला आयपीएलच्या पदार्पणाचा हंगाम 3 ते 26 मार्च दरम्यान सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच या स्पर्धेत 22 सामने घेण्याची योजना असून मार्चच्या अखेरीस फायनल सामना होऊ शकतो.

"महिला आयपीएल ही पाया मजबूत करण्यासाठी उत्तम स्पर्धा असणार आहे. ज्याप्रकारे बीग बॅश लीग आणि Women’s 100ने अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी कार्य केले आहे, हेच काम महिला आयपीएल आम्हाला हाय प्रेशरचे सामने हाताळण्यास मदत करेल", असे भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने एएनआयशी बोलताना सांगितले.

महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) ट्वेंटी-20 विश्वचषक पार पडल्यानंतर सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

फेब्रुवारीमध्ये महिला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना माहिती पाठवली आहे. या लिलावासाठी खेळाडूंना 26 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

अलीकडेच बीसीसीआयने या स्पर्धेतील संघांच्या मालकी हक्कांसाठी निविदा काढल्या होत्या. यासोबतच मीडियाच्या हक्कांसाठीही निविदा काढण्यात आल्या आहेत.

मात्र, बीसीसीआयने अद्याप महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. तर पुरूषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

2017 च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महिला संघ इंग्लंडकडून पराभूत झाल्यापासून महिला क्रिकेटला भारतात लोकप्रियता मिळू लागली आहे.

भारतीय महिला संघाने 2022 मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला अंतिम पराभूत केल्याने भारतीय महिलांचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.