PHOTOS : कुठे हसू तर कुठे अश्रू! पुन्हा एकदा भारत पाकिस्तानला वरचढ; 'इंडिया चॅम्पियन्स'चा एकच जल्लोष

World Championship of Legends 2024 Final : इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून किताब जिंकला.

भारत आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेटच्या मैदानात भेटतात तेव्हा अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागते. शनिवारी पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना हा थरार अनुभवता आला.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडले. इंग्लंडच्या धरतीवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला.

यासह युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला भारत सिक्सर किंग युवराज सिंगच्या नेतृत्वात होता.

इंडिया चॅम्पियन्सकडून अंबाती रायुडूने अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५० धावा कुटल्या. नेहमीप्रमाणे पाकिस्तानला या सामन्यातही खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला.

अंबाती रायुडूच्या अप्रतिम अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने सोपा झेल सोडून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शेजाऱ्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या.

भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. पाकिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.१ षटकांत ५ बाद १५९ धावा करून चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

इंडिया चॅम्पियन्सच्या विजयानंतर सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. युसूफ पठाण आणि इरफान पठाण ही जोडी थिरकताना दिसली. तर दुसरीकडे पाकिस्तानचे शिलेदार यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे दु:ख दिसत होते.

अखेर कर्णधार युवराज सिंगने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

इरफानने विजयी चौकार लगावताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. युवराज आणि इरफान यांनी केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता.