IND vs BAN: विराट कोहलीला नंबर-1 बनण्याची सुवर्णसंधी; सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात

विराट कोहलीची तीन पैकी दोन सामन्यात दमदार अर्धशतके

Virat Kohli Sachin Tendulkar, IND vs BAN : भारतीय संघाची यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी दमदार झाली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारली. त्यानंतर अफगाणिस्तानला टीम इंडियाने हरवलं.

विजयाचा डबल धमाका केल्यावर, भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं. फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन प्रतिभावान संघ पराभूत झाले.

आज भारताचा बांगलादेशशी सामना आहे. बांगलादेशचा संघदेखील चांगल्या स्पिनर्सने युक्त आहे. त्यामुळे भारताच्या स्टार फलंदाजांना दमदार खेळी करावी लागेल. पुण्यात हा सामना रंगणार आहे.

भारताकडून तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतके ठोकणारा विराट कोहली दमदार फॉर्मात आहे. आजच्या सामन्यात विराट मोठा पराक्रम करू शकतो. तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.

विराट कोहली क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला ७७ धावांची खेळी करण्याची गरज आहे.

विराटने ७७ धावा करताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २६ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज बनेल. हा विश्वविक्रम सध्या सचिनच्या नावे आहे. कोहलीने आतापर्यंत ५१० सामन्यांत ५६६ डावांमध्ये २५ हजार ९२३ धावा केल्या आहेत.