World Cup 2023 Schedule: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा आल्या समोर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार फायनल!

या वर्षी भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा समोर आल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या स्पर्धेसाठी डझनभर ठिकाणांची निवड केली आहे.

World Cup 2023 Schedule: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तारखा समोर आल्या आहेत. अंतिम सामना कुठे होणार, हेदेखील निश्चित झालं आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणांची माहिती उघड करण्यात आली आहेत. त्यानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या १० संघांच्या स्पर्धेसाठी डझनभर ठिकाणांची निवड केली आहे.

बीसीसीआयनं विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सर्वात मोठं असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमला अंतिम केलंय. याचाच अर्थ या ठिकाणी अंतिम सामना पार पडणं जवळपास निश्चित आहे. ही स्पर्धा तब्बल ४६ दिवस चालणार आहे. यादरम्यान १० संघांमध्ये ३ प्ले ऑफ सह ४८ सामने खेळवण्यात येतील.

या सर्व सामन्यांसाठी बीसीसीआयनं अहमदाबादसह बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, राजकोट आणि मुंबई ही ठिकाणं शॉर्टलिस्ट केली आहेत. दरम्यान. आयसीसी स्पर्धेच्या तारखा एक वर्ष अगोदर जाहीर केल्या जातात.

यावेळी बीसीसीआय भारत सरकारकडून काही आवश्यक मुद्द्यांवर मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे. पाकिस्तानच्या संघासाठी व्हिसा मंजुरी आणि या स्पर्धेसाठी करात सूट मिळवणं या दोन मुद्द्यांचा यात समावेश आहे.

आयसीसीची यापूर्वीची अखेरची बैठक दुबईत झाली होती. या बैठकीत बीसीसीआयनं पाकिस्तानला विश्वचषकासाठी भारत दौर्‍यासाठी व्हिसा देण्याचं आश्वासन दिलंय. जोपर्यंत कर सवलतीच्या मुद्द्याचा संबंध आहे, अशी अपेक्षा आहे की बीसीसीआय लवकरच आयसीसीला भारत सरकारच्या नेमक्या स्थितीबद्दल माहिती देईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका (कसोटी, एकदिवसीय, T20) डिसेंबर २०१२ मध्ये खेळली गेली होती. तेव्हा पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि दोन्ही संघांमध्ये २ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत होती. तर एकदिवसीय मालिकेत पाकिस्ताननं २-१ ने विजय मिळवला होता.