Mumbai Indians, WPL 2023 MI vs GG : मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक

कर्णधार हरमनप्रीतचं धडाकेबाज अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने आठ गडी गमावून १६२ धावा केल्या. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीतने ३० चेंडूत सात चौकार व दोन षटकारांसह ५१ धावा केल्या. तर यास्तिका भाटियाने ३७ चेंडूत ४४ धावांची खेळी केली.

सामन्यात मुंबईने आपले वर्चस्व दाखवून गुजरातचा एकतर्फी पराभव केला. मुंबईचा हा सलग पाचवा विजय आहे. त्यांना आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. या दोन संघांमधील हा या मोसमातील दुसरा सामना होता. दोन्ही सामन्यात फक्त मुंबईने विजय मिळवला.

गुजरात संघाला २० षटकात नऊ गडी गमावून केवळ १०७ धावाच करता आल्या आणि सामना गमवावा लागला. गुजरातकडून हरलीन देओलने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर कर्णधार स्नेह राणाने केवळ २० धावा केल्या.

Mumbai Indians first team to qualify for playoffs: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. WPLमध्ये मुंबई प्लेऑफचं तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला.

मुंबईकडून नॅट स्कीव्हरने २१ धावांत ३ बळी घेतले. तर हेली मॅथ्यूजनेही २३ धावा देत ३ गडी बाद केले. याशिवाय अमेलिया केर हिनेदेखील १८ धावांत ४ बळी टिपले.

पॉईंट्स टेबलचा विचार करता मुंबईचा संघ सर्वात वरती आहे. त्याखालोखाल दिल्लीचा संघ ५ पैकी ४ विजय मिळवून दुसरा आहे. युपीच्या संघाने ४ पैकी २ विजय मिळवले आहेत. तर गुजरात जायंट्सने ५ पैकी केवळ १ विजय मिळवला आहे. बंगळुरूच्या संघाला मात्र अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.