WPL 2024: ४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात स्पर्धेबाहेर

wpl points table 2024: मुंबईने ७ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबईने ७ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुंबई १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने ७ विकेट राखून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सचा ७ सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या.

गुजरातने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात मुंबईने १९.५ षटकांत ३ विकेट गमावून लक्ष्य गाठले. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक झळकावले. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघही ठरला आहे.

गुजरात जायंट्सला पराभूत करून मुंबईने क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईने सात सामन्यांमधील ५ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. आताच्या घडीला दिल्ली दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या आणि यूपी वॉरियर्स चौथ्या स्थानी आहे. तर गुजरातचा संघ तळाशी आहे.

शनिवारी गुजरात जायंट्सकडून प्रथम फलंदाजी करताना हेमलताने ७४ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय बेथ मुनीने ६६ धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला २० षटकात ७ बाद १९० धावा करता आल्या.

मुंबईकडून गोलंदाजी करताना सायका इशाकने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर हेली, सजीवन, पूजा आणि शबनीम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रत्युत्तरात १९१ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या हिली मॅथ्यूज आणि यास्तिका यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये ५० धावांची भागीदारी झाली.

यास्तिका ४९ धावा करून बाद झाली तर मॅथ्यूज १८ धावा करून तंबूत परतली. तर नताली सीव्हर अवघ्या २ धावा करून बाद झाली.

संघ अडचणीत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने ९५ धावांची नाबाद खेळी केली. तिच्या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. हरमनच्या खेळीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकला आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले. या पराभवासह गुजरातचा संघ स्पर्धेबाहेर झाला.