WTC Final 2023 Equations : भारतासमोर दुहेरी आव्हान; विजय न मिळवल्यास होईल मोठं नुकसान, जाणून घ्या गणित

WTC Final 2023 Equations : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या फायनलमध्ये कोण खेळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि याचा फैसला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतून होणार आहे.

भारतात होणाऱ्या या मालिकेत यजमानांवर दुहेरी आव्हान आहे. फायनलमध्ये जागा पटकावण्यासोबतच त्यांना कसोटी क्रमवारीत नंबर १ बनण्याची संधी आहे. अंतिम फेरीतील संघांबद्दल अजूनही सस्पेंस कायम आहे.

ऑस्ट्रेलिया सध्या ७५.५६ टक्केवारीसह तालिकेत अव्वल आहे. भारत ५८.९३% गुणांसह दुसऱ्या, श्रीलंका ५३.३३% गुणांसह तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका ४८.७२% गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चार कसोटी), न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (दोन कसोटी) आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (दोन कसोटी) या अशा WTC पर्वातील तीन मालिका बाकी आहेत. भारतीय संघाला अंतिम फेरीतील दोन संघांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-०, ३-० किंवा ३-१ ने विजय मिळवला, तर भारत निश्चितपणे WTC फायनलसाठी पात्र ठरेल, इतर दोन कसोटी मालिकांचा निकाल काही लागला तरी भारत फायनल खेळेल.

भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-४ असा हरला तर भारताचे ४५.४ टक्के होतील आणि फायनलसाठी ते स्पर्धेबाहेर राहतील. पण, भारताने ही मालिका २-१, २-० किंवा १-० अशी जिंकली तरीही भारताला संधी आहे.

रोहित शर्मा अँड कंपनीने २-१ ने मालिका जिंकली तर त्यांची टेबलमधील अंतिम गुणांची टक्केवारी ५८.८ टक्के होईल. २-० अशा विजयानंतर ही टक्केवारी ६०.६५ अशी होईल आणि १-० अशा विजयानंतर ती ५६.९४ टक्के होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका शर्यतीतून बाहेर पडेल. पण न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेची कामगिरी कशी आहे यावर भारताच्या संधी अवलंबून असतील.

श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडमध्ये एकाहून अधिक कसोटी जिंकू शकला नाही, तर भारताला पात्र होण्याची संधी आहे. दुसरीकडे, श्रीलंकेने दोन्ही कसोटी सामने गमावले, तर भारत निश्चितपणे फायनल खेळेल. पण श्रीलंकेने २-० असा विजय मिळवला तर ते अंतिम फेरीत पोहोचतील.

जर टीम इंडियाने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली तर पॉइंट टेबलवर त्यांची गुणांची टक्केवारी ५६.४ टक्के होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका शर्यतीतून बाहेर पडेल. श्रीलंकेने मालिका जिंकली नाही तर भारत पात्र ठरेल. भारताने मालिका ०-२, १-२, १-३ आणि ०-३ अशा फरकाने गमावली तर भारत इतर संघांवर खूप अवलंबून असेल.