तब्बल १८ वर्षांनंतर IND vs PAK कसोटी होणार? पाकिस्तानला करावा लागेल मोठा संघर्ष

IND vs PAK Match : भारत आणि पाकिस्तान अशी फायनल होण्यासाठी शेजाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागेल.

पाकिस्तान आपल्या मायदेशात बांगलादेशविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आठ महिन्यांनंतर पाकिस्तानचा संघ कसोटी क्रिकेट खेळत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) २०२३-२५ च्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेजाऱ्यांना ही मालिका जिंकणे खूप गरजेचे आहे. यातील विजय त्यांना स्पर्धेत जिवंत ठेवेल.

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागेल. यंदाच्या वर्षातील आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या पाकिस्तानसमोर विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान आहे. जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता.

WTC ची फायनल खेळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने सांगितले. शेजाऱ्यांना अद्याप एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही, तर भारताने सलग दोनवेळा फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

पण, पहिल्या अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंड आणि दुसऱ्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची पाकिस्तानकडे संधी आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातही किताबासाठी लढत होऊ शकते. असे झाल्यास तब्बल १८ वर्षांनंतर IND vs PAK असा कसोटी सामना होईल.

पाकिस्तानने WTC २०२३-२५ च्या साखळी फेरीतील केवळ दोन मालिका खेळल्या आहेत. त्यांना अजून चार मालिका खेळायच्या आहेत, ज्यामधील तीन मालिका पाकिस्तानच्या धरतीवर होतील.

शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ दोन विजय, तीन पराभव आणि ३६.६६ विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरूद्ध आपल्या देशात खेळेल. तर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारत (६८.५२%) आणि ऑस्ट्रेलिया (६२.५०%) हे फायनलचे प्रबळ दावेदार आहेत.

अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला खूप खडतर प्रवास करावा लागेल. भारताला फायनल गाठण्यासाठी दहापैकी कमीत कमी पाच सामने जिंकायचे आहेत.

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तर पाकिस्तानला उरलेले सर्व नऊ सामने जिंकावे लागतील. याआधी भारत मायदेशात बांगलादेशविरूद्ध मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूद्ध देखील खेळणार आहे.

जर पाकिस्तानने आपले सर्व नऊ सामने जिंकले तर त्यांची विजयाची टक्केवारी ७७.३८ एवढी होईल आणि यासह ते अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतील.

जर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाची जागा घेतली तर भारतासोबत त्यांची फायनल होऊ शकते. म्हणजेच १८ वर्षांनंतर दोघांमध्ये कसोटी सामना होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटच्या वेळी २००७ मध्ये कसोटी सामना खेळला गेला होता.