Test Championship IND vs BAN 1st test: WTC 2023 Final साठी Team India ला आणखी किती कसोटी जिंकाव्या लागणार... समजून घ्या गणित

टीम इंडियासाठी काय आहे फायनलचं समीकरण... वाचा सविस्तर

WTC Test Championship Final Equation for Team India: भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा १८८ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चेतेश्वर पुजाराने दोन्ही डावात चांगली कामगिरी केली पण कुलदीप यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.

दोन्ही संघांमधील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना २२ डिसेंबरपासून ढाका येथे खेळवला जाणार आहे. पण चितगाव कसोटीतील विजयामुळे भारताने 2021-23च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉइंट टेबलमध्येही महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे.

भारत गुणतालिकेच दुसऱ्या क्रमांकावर- भारतीय संघाने आता श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताला आणखीनच फायदा झाला आहे.

चॅम्पियनशिपच्या चालू हंगामात भारतीय संघाने एकूण १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्याचे दोन सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाची टक्केवारी सध्या ५५.७७ आहे.

WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल- जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ अजूनही अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १३ पैकी ९ कसोटी जिंकल्या असून त्यांची विजयाची टक्केवारी ७६.९२ इतकी आहे.

ताज्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांची विजयाची टक्केवारी ५४.५५ इतकी आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहेत, जी या चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.

यादीत चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ ५३.३३ टक्क्यांसह विराजमान आहे. त्यानंतर ४४.४४ टक्के गुणांसह इंग्लंडचा संघ पाचवा तर पाकिस्तानचा संघ ४२.४२ टक्के गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेले आहेत.

भारतासाठी काय आहे समीकरण?- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाचे समीकरण अधिकच स्पष्ट झाले आहे. अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी भारताला आता उर्वरित ५ पैकी चार सामने जिंकावे लागतील. भारताला आता या महिन्यात बांगलादेशविरुद्ध आणखी एक कसोटी सामना खेळायचा आहे.

त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ती मालिका अटीतटीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने पुढच्या कसोटीतही बांगलादेशला हरवल्यास टीम इंडियाची वाटचाल सोपी होईल आणि अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला अंतिम फेरीत स्थान मिळू शकेल.