Join us

Arjun Tendulkar: "अर्जुन तेंडुलकरला त्याच्या आईपासून दूर ठेव...", योगराज सिंग यांनी सचिनला दिला होता अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:05 IST

Open in App
1 / 8

सध्या भारतीय क्रिकेटचा दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर खूप चर्चेत आहे. त्याच्यासोबत त्याचे प्रशिक्षक आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनीही सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्जुनने अलीकडेच गोव्याच्या संघाकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले.

2 / 8

आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध शानदार शतक झळकावले. अर्जुनने शतक झळकावून 34 वर्षांपूर्वी रणजी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम करणारे वडील सचिन यांची बरोबरी केली. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात अर्जुन आपल्या घातक गोलंदाजीने झारखंडच्या फलंदाजांना घाम फोडत होता.

3 / 8

अर्जुनच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शानदार खेळीचे श्रेय योगराज सिंग यांना दिले जात आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या युवा खेळाडूने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.

4 / 8

योगराज सिंग यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सचिनला दिलेल्या एका सल्ल्याबद्दल बोलताना योगराज सिंग यांनी म्हटले, 'मी सचिनला एक गोष्ट सांगितली होती की, अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव. कारण कोणत्याही आईला आपल्या मुलाला जखम झालेली किंवा कष्ट सहन करावे लागलेले पाहवत नाही.'

5 / 8

योगराज सिंग आणखी म्हणाले, 'मी सचिनला सांगितले की अर्जुनने लक्ष केंद्रित करावे आणि तो जे करत आहे ते करत राहावे अशी माझी इच्छा आहे. तसेच असेही सांगितले की तुझा मुलगा प्रतिभावान आहे आणि मुंबई इंडियन्सने हे टॅलेंट गमावले आहे. अर्जुन जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होईल. मला सचिनसाठी अर्जुनला घडवायचे आहे. तो युवीसारखा निर्भय होईल. अर्जुनला वडिलांच्या छायेतून बाहेर येण्याची गरज होती. मी त्याला सांगितले, तू आधी अर्जुन आहेस आणि नंतर अर्जुन तेंडुलकर आणि त्यानंतर सचिनचा मुलगा आहेस.'

6 / 8

खरं तर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग अर्जुन तेंडुलकरला तयार करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. क्रिकेटचे धडे देताना योगराज सिंग हे युवराजबाबत खूप कडक असायचे. युवराज सिंगच्या निवृत्तीनंतर योगराज सिंग यांनी याबाबत सांगितले होते. याशिवाय माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो असेही युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितले.

7 / 8

वयाच्या 6 व्या वर्षी तो (युवराज) स्केटिंग करायचा आणि टेनिस खेळायचा, पण योगराज यांना खटकले त्यामुळे ते त्याचे स्केट्स आणि टेनिस रॅकेट तोडायचे. युवराज सिंग रडायचा आणि त्यांच्या सेक्टर 11 च्या घराला जेल म्हणायचा. योगराज यांनी असेही सांगितले की, ते त्याला ड्रॅगन सिंग म्हणून हाक मारायचे. युवराजच्या वडिलांनी सांगितले की, एक पिता या नात्याने त्यांना आपल्या मुलाला सन्मान बहाल करण्यास सांगण्याचा आणि पुन्हा अभिमानाने चालण्याचा अधिकार आहे.

8 / 8

योगराज सिंग यांनी सांगितले होते की, 'युवराज सहा वर्षांचा होता जेव्हा मी त्याला सेक्टर 16 च्या स्टेडियममध्ये घेऊन गेलो जिथे मी ट्रेनिंग करायचो. तिथे एक अकादमी होती आणि मी युवराजला हेल्मेटशिवाय सराव करायला सांगायचो. त्याला क्रिकेटचा तिरस्कार होता पण मी त्याच्यात क्रिकेटची आवड निर्माण केली, जी आता त्याचे जीवन आहे. त्याला क्रिकेटचे व्यसन लागले आणि आता त्याने काय मिळवले हे सर्व जगाला माहीत आहे.'

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरयुवराज सिंगरणजी करंडक
Open in App