Join us  

T20 World Cup : बुमराहला दुखापत, BCCI चिंतेत; बिन्नी म्हणाले, 'गेल्या ४-५ वर्षांपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 7:56 AM

Open in App
1 / 8

T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंना वारंवार दुखापती होण्याच्या समस्येचा सामना करणे खूप महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच विश्वचषकाच्या 10 दिवस आधीच तुम्ही जसप्रीत बुमराहच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

2 / 8

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तीन दिवस आधी बुमराहला T20 विश्वचषकातून वगळण्यात आले होते. त्याचवेळी मोहम्मद शमीला कोविड-19 ची लागण झाली होती आणि त्यामुळे बुमराहच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यासाठी बीसीसीआयला शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

3 / 8

बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही बिन्नी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. “अत्ताच नाही तर गेल्या चार पाच वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. खेळाडूंना इतक्या वाईट रीतीने दुखापत का होत आहे याचा शोध घेण्याची गरज आहे,' असं कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सत्कार समारंभात बिन्नी म्हणाले.

4 / 8

“आमच्याकडे चांगला ट्रेनर किंवा कोच नाही असे नाही. खेळाडूंवर खूप ताण आहे की ते खूप फॉरमॅट खेळत आहेत का? यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. हे माझं प्राधान्य आहे,' असंही ते म्हणाले.

5 / 8

विश्वचषकाच्या १० दिवस आधी बुमराहला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याची जागा कोण घेईल याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. याला सामोरं जाणं महत्त्वाचं असल्याचं बिन्नी म्हणाले. बीसीसीआय अध्यक्षांनी रणजी ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांसाठी चांगल्या विकेट्स तयार करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

6 / 8

'सध्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल नाहीत. आम्हाला पायाभूत सुविधांवरही काम करावे लागेल,” असंही बिन्नी म्हणाले. भारतीय क्रिकेटपटूंच्या धर्तीवर देशांतर्गत क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देण्याबाबत बिन्नी म्हणाले, “देशांतर्गत क्रिकेटपटूंची काळजी घेतली जात आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. मला वाटत नाही की त्याची (केंद्रीय कराराची) सध्या गरज आहे.'

7 / 8

बीसीसीआयने पुढील वर्षी पाकिस्तान दौर्‍याबाबत अद्याप सरकारशी संपर्क साधला नाही, परंतु अखेरीस केंद्र सरकार या प्रकरणावर निर्णय घेईल. 'हा बीसीसीआयचा कॉल नाही. आम्हाला देश सोडण्यासाठी सरकारची मंजुरी हवी असते. आम्ही आपला देश सोडतो किंवा विदेशी संघ देशात येतो, यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक असते. एकदा आम्हाला सरकारकडून मंजुरी मिळाली की आम्ही त्याबाबतीत निर्णय घेऊ, आम्ही स्वतः याबाबत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला सरकारवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पाकिस्तानला जायचे की नाही यावर आम्ही अद्याप त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही,' असं रॉजर बिन्नी यांनी सांगितलं.

8 / 8

खरं तर 2008 च्या आशिया चषकापासून भारतीय संघ एकदाही पाकिस्तानला गेला नाही. त्याच वर्षी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2009 च्या सुरुवातीला नियोजित द्विपक्षीय मालिका रद्द करण्यात आली होती. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारतानं शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात.

टॅग्स :जसप्रित बुमराहट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतीय क्रिकेट संघ
Open in App