Join us  

Yuvraj Singh's Retirement: या आहेत युवराजच्या गाजलेल्या खेळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 2:46 PM

Open in App
1 / 13

धडाकेबाज फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर गेली दोन दशके भारतीय क्रिकेटविश्व गाजवणारा टीम इंडियाचा युवराज अर्थात युवराज सिंग याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये युवराजने अनेक लढतींमध्ये संस्मरणीय खेळ्या करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. युवीने केलेल्या काही अविस्मरणीय खेळींचा घेतलेला हा आढावा.

2 / 13

केनियामध्ये झालेल्या आयसीसी नॉकआऊट स्पर्धेत युवराज सिंगला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यावेेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत युवीने ८० चेंडूत ८४ धावांची जबरदस्त खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या आगमनाची वर्दी दिली होती. युवीच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची किमया साधली होती.

3 / 13

झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर पडला असताना चौथ्या सामन्यात युवीला भारतीय संघात स्थान मिळाले होते. या लढतीत भारतीय संघ अडचणीत सापडला असताना युवीने नाबाद ८० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

4 / 13

२००२ च्या इंग्लड दौऱ्यातील तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने मिळवलेला विजय हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक संस्मरणीय विजय मानला जातो. या लढतीत तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवातीनंतर भारताचा डाव कोलमडला होता. अशावेळी युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी जबरदस्त भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला होता.

5 / 13

२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिरंगी मालिकेतील सातव्या लढतीत युवराज सिंगने सलामीस येत १३९ धावांची जबरदस्त खेळी केली होती. या वेळी युवीने व्हीव्हीएस लक्ष्मणसमवेत चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी केली.

6 / 13

२००६ च्या पाकिस्तान दौऱ्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत युवराजने जबरदस्त फलंदाजी केली होती. या मालिकेती शेवटच्या सामन्यात मोठ्या आव्हानाचा सामना करताना भारताची सुरुवात संथ झाली होती. मात्र युवराज सिंगने शानदार शतकी खेळी करताना महेंद्रसिंह धोनीच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला होता.

7 / 13

२००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयामध्ये युवराज सिंगची भूमिका मोलाची होती. या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या लढतीत युवीने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ चेंडूत ६ उत्तुंग षटकार ठोकले होते. तसेच अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक फटकावण्याची किमया साधली होती.

8 / 13

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमालीचा यशस्वी झालेल्या युवीला कसोटी क्रिकेटमधील कामगिरीत मात्र सातत्य राखता आले नाही. मात्र २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने केलेली १६९ धावांची खेळी अविस्मरणीय अशी होती. या खेळीदरम्यान, युवीने सौरव गांगुलीसमवेत ३०० धावांची भागीदारी केली होती.

9 / 13

या लढतीत युवराजच्या वादळी खेळीचा फटका इंग्लंडला पुन्हा एकदा बसला होता. गंभीर आणि सेहवागने दिलेल्या धडाकेबाज सुरुवातीनंतर युवीनेही इंग्लिश गोलंदाजांची जोरदार पिटाई केली. कंबरदुखीने त्रस्त असतानाही त्याने अवघ्या ७८ चेंडूत १३८ धावा कुटल्या.

10 / 13

श्रीलंकेविरुद्धच्या या लढतीत युवराज सिंगने ११७ धावांची खेळी करताना वीरेंद्र सेहवागसह २२१ धावांची भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.

11 / 13

२०११ च्या विश्वचषक उपांत्यपूर्व लढतीत युवीने केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे भारताला सलग तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत फेरी गाठणे शक्य झाले. प्रथम गोलंदाजीत चमक दाखवल्यानंतर युवीने नाबाद ५७ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.

12 / 13

या लढतीत फटकावलेल्या १५० धावा ही युवराज सिंगची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्स झटपट गेल्यानंतर युवीने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने २५६ धावांची भागीदारी केली आणि सामन्याला कलाटणी दिली.

13 / 13

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत युवीने ३२ चेंडूत ५३ धावा कुटल्या होत्या. त्या खेळीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारत दणदणीत विजय मिळवला. युवराज या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरला. एकदिवसीय क्रिकेटमधील युवीचा हा शेवटचा सामनावीर पुरस्कार ठरला.

टॅग्स :युवराज सिंगभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ