ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा नाणेफेकीला खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व झेल टिपणाऱ्या संघाच्या विजयाची शक्यता तर अधिक असतेच पण त्यासोबतच आता नाणेफेकीकडेही सर्वांचं लक्ष असतं.
सामन्याचा निकाल आता नाणेफेकीवरच ठरू लागलाय की काय असंच चित्र यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळालं आहे. कारण तसे पुरावेच आपल्यासमोर आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुबईच्या स्टेडियमवर ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आता आपण दुबईच्या स्टेडियमवर यंदा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप सामन्यांमधील नाणफेकीचा ट्रेंड देखील पाहुयात.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकूण १२ सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं विजयाची नोंद केली आहे. यातही ११ सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पण यातही आज जर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला तरी एक विजयाचा मार्ग आहे. फलंदाजी घेणाऱ्या संघाला आज कमीत कमी १८० धावा कराव्या लागतील. तरच २०१८ सालानंतर नवा इतिहास दुबईच्या मैदानात रचला जाईल.
दुबईच्या स्टेडियमवर २०१८ सालापासून ते आतापर्यंत गेल्या २० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ज्या संघानं प्रथम फलंदाजी करत १८० धावा केल्या आहेत त्या संघानं विजय प्राप्त केला आहे. २० सामन्यांमध्ये १९ सामने १८० हून अधिक धावा करणारा संघ जिंकला आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकवर आतापर्यंत ६ संघांनी आपलं नाव कोरलं आहे. यातील पाच संघ तर नाणेफेक जिंकलेल्याच संघानं विजय प्राप्त केला आहे. फक्त एकाच संघाचा अपवाद आहे. २००९ साली श्रीलंकेनं नाणेफेक गमावूनही पाकिस्तान विरुद्ध विजय प्राप्त केला होता.
गेल्या ६ अंतिम सामन्यांमध्ये ३ वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणारा, तर ३ वेळा प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये एकूण २५ सामने रात्री खेळविण्यात आले. या २५ सामन्यांपैकी १७ सामने नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकला आहे. तर फक्त ८ सामने नाणेफेक गमावलेल्या संघानं जिंकले आहेत. त्यामुळेच नाणेफेकीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.