ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहेविराट कोहली व रोहित शर्मा हे इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे अशात श्रीलंका दौऱ्यासाठी नवा कर्णधार
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ( वि. न्यूझीलंड) आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याच दरम्यान जुलै महिन्यात भारतीय संघाची दुसरी फळी श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. हा दौरा भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिला जाईल कारण या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे सोपवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड अँड टीम सज्ज झाली आहे. संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवन याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे.
राहुल द्रविड मागील अनेक वर्षांपासून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याचे काम करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघानं 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर द्रविडनं भारताच्या अ संघालाही मार्गदर्शन केलं. सध्या तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत आहे. याच NCAच्या सदस्यांना सोबत घेऊन द्रविड श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाला दिशा दाखवणार आहे.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार 13 जुलै पासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सरावासाठी एक आठवड्याचा कालावधी मिळणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडू बंगळुरू येथे दाखल होतील. तेथे ते काही दिवस विलगिकरणात राहतील. त्यानंतर श्रीलंकेतही त्यांना काही दिवस विलगिकरणात रहावे लागेल. कोरोना नियमानुसार सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!
विराट कोहली व रोहित शर्मा हे इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे अशात श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघाच्या नेतृत्वासाठी शिखर धवन हा तगडा उमेदवार आहे. श्रेयस अय्यर याचेही नाव चर्चेत असले तरी तो खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील आठवड्यात या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे.
Web Title: Rahul Dravid set to coach Team India on Sri Lanka tour, Shikhar Dhawan likely to captain: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.