कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करता यावा, याकरिता भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आला होता. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं तो ठेवला होता. त्यावरून त्याच्यावर टीका झाली. पण, आता पाकिस्तानच्या आणखी एका माजी खेळाडूला भारत-पाक मालिकेचे स्वप्न पडू लागले आहेत.
प्रत्येक क्रिकेट चाहत्याला भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना पाहण्याची उत्सुकता असते. सध्या उभय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. दोन्ही देशांमध्ये 13 वर्षांपासून द्विदेशीय मालिका झालेली नाही. कोरोना व्हायरसच्या संकटात दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवून निधी गोळा करण्याचा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता. या मालिकेतून उभ्या राहणाऱ्या निधीचे दोन्ही देशांत समसमान वाटप करण्याचा प्रस्तावही अख्तरनं ठेवला होता.
आता रमीझ राजा यांनीही भारत-पाक मालिकेसाठी पुढाकार घ्यायला हवा, असं मत व्यक्त केलं. पण, परिस्थिती सुधारल्यानंतर भारत-पाक मालिकेच्या दृष्टीनं एक पाऊल टाकायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की,''क्रिकेटवर एवढं दडपण का टाकलं जात आहे, हे कळत नाही. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. आता पुढाकार घ्यायला हवा. भारत-पाकिस्तान मालिकेसाठी मी तयार आहे.''
''भारत-पाकिस्तान मालिकेच्या दृष्टीनं बेबी स्टेप्स घेतली पाहिजे. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक व्ह्यूवर्स होते. ब्रॉडकास्टर, आयोजकांना भारत-पाकिस्तान सामना हवा आहे. चाहत्यांमध्येही दोन्ही देशांच्या क्रिकेट सामन्याची उत्सुकता असते,'' असेही राजा यांनी स्पष्ट केलं.
भारताला पैशांची गरज नाही, खेळाडूंच्या जीवाशी का खेळायचं? कपिल देव यांनी अख्तरला फटकारलं
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अख्तरच्या प्रस्तावाचा चांगलाच समाचार घेतला. कपिल देव यांनी यावरून अख्तरला फटकारलं. ते म्हणाले,''भारताला पैशांची गरज नाही. त्यामुळे अशी मालिका खेळवायला नको आणि क्रिकेटपटूंचं जीव कशाला धोक्यात घालायचा? त्यामुळे निवांत राहा आणि घरीच थांबा. एकाचाही जीव धोक्यात घालायचं संकट का ओढावून घ्यायचे? त्यामुळे अशा सल्ल्याची गरज नाही. प्रशासन योग्य काम करत आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
Web Title: Ramiz Raja says he is ready for an India-Pakistan series svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.