भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेअंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानातून भारतीय संघ आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात करेल. आव्हानात्मक अशा कसोटी मालिकेतील पर्थच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग इलेव्हन काय असेल? हा विषय आता चर्चेत आला आहे.
प्लेइंग इलेव्हनचं टेन्शन; शास्त्रींनी अप्रत्यक्षरित्या गंभीर अन् टीम मॅनेजमेंटला दिला मोलाचा सल्ला
भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. तो पर्थ कसोटी सामन्यात खेळणार की नाही, हे अद्याप अस्पष्टच आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात कोण करणार? हा मोठा पेच टीम इंडियासमोर असेल. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलवर ही जबाबदारी टाकणार असल्याचे संकेत दिले होते. पण ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धची त्याची ढिसाळ कामगिरी हा प्लान टीम इंडियाला गोत्यात आणणारा ठरू शकतो. यादरम्यान माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संभाव्य प्लेइंग निवडत टीम इंडियाला पर्थ कसोटीसाठी सल्ला दिल्याचे दिसते.
रोहितच्या अनुपस्थितीत सलामीसाठी सुचवलं हे नाव
रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने मागील दोन बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केले होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्लेइंग इलेव्हनचा सल्ला टीम इंडियासाठी फायद्याचा ठरू शकतो, अशीही एक चर्चा रंगत आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थिती केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन ऐवजी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल ही जोडी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे शास्त्रींना वाटते.
सर्फराजला दिलं नाही स्थान, शास्त्रींच्याही लाडाचा निघाला केएल राहुल
आयसीसीच्या खास शोमध्ये रवी शास्त्री यांनी शुबमन गिलला पुन्हा एकदा सलामीवीराची जबाबदारी द्यावी, असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये लोकेश राहुलला स्थान देत सर्फराज खानला बाकावर बसवल्याचेही पाहायला मिळते. शास्त्रींनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या रुपात निवडले आहे. दुसरीकडे जुरेल ध्रुवलाही त्यांनी संघात स्थान दिल्याचे दिसते.
पर्थ कसोटीसाठी रवी शास्त्रींची संभाव्य प्लेइंग XI
शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
Web Title: Ravi Shastri Give Advice To gautam gambhir With Predicts India XI For First Test Against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.