Road Safety World Series : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार... पहिल्या षटकात 19 धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागची ( Virender Sehwag) ही स्टाईल आजही कायम आहे. निवृत्तीनंतरही वीरूच्या फलंदाजीचा जलवा तसाच कायम असलेला पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) नॉन स्ट्राईकर एंडला उभा राहून वीरूच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीचा आस्वाद लुटत होता. ( Virender Sehwag 80*(35) and Sachin Tendulkar 33*(26)) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्याच सामन्यात इंडिया लिजंड ( India Legends) संघानं दणक्यात विजय साजरा केला. युवराज सिंगनंही ( Yuvraj Singh) दोन विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वीरूच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं 10.1 षटकांत बांगलादेश लिजंड ( Bangladesh Legends) संघावर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. ( India Legends beat Bangladesh Legends by 10 wickets)
बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत 109 धावच करता आल्या. युवराज सिंग ( 2/15), प्रग्यान ओझा ( 2/12) आणि विनय कुमार ( 2/25) यांनी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. बांगलादेशकडून नझीमुद्दीननं 33 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 49 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात वीरूच्या फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. मोहम्मद रफिकच्या पहिल्याच चेंडूवर वीरूनं त्याच्या स्टाईलनं चौकार खेचला. पहिल्याच षटकात वीरूनं 4,4,6,0,4,1 अशा 19 धावा कुटल्या. वीरू एकदा गिअरमध्ये आला म्हणजे त्याला थांबवणं शक्य नाही.
त्यानं 35 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. सचिन तेंडुलकर 26 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 33 धावांवर नाबाद राहिला. वीरूनं सुरुवात चौकारानं केली, तर शेवट षटकारानं केला. त्याच्या 80 धावांमधील 70 धावा या फक्त चौकार-षटकारांनी आल्या.
Web Title: Road Safety World Series : Virender Sehwag smashed 80* runs from just 35 balls, India Legends beat Bangladesh Legends
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.