mumbai vs odisha ranji live | मुंबई: मुंबईकरश्रेयस अय्यरने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केला. सध्या मुंबईतील एमसीए मैदानात मुंबई आणि ओडिशा यांच्यात लढत होत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने चमकदार कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि संकटमोचक म्हणून ओळखला जाणाऱ्या सिद्धेश लाड (१६५) यांनी मोठी भागीदारी नोंदवली. अय्यर द्विशतकी खेळी करुन तंबूत परतला, तर लाड खेळपट्टीवर टिकून राहिला. श्रेयसने ९ षटकार आणि २४ चौकारांच्या मदतीने २२८ चेंडूत २३३ धावा केल्या. मुंबईचा सलामीवीर अंगकृश रघुवंशी ९२ धावांवर बाद झाल्याने शतकाला मुकला. तर, कर्णधार अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूत बाद झाला. मुंबईने १२० षटकांत ४ बाद ५५६ धावा कुटल्या.
श्रेयस अय्यर रणजी करंडक स्पर्धेत गतविजेत्या मुंबईच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक शतकासह त्याने आपल्यातील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. याआधीच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याला अपेक्षित धमाका करता आला नव्हता. पण आता तो चांगलाच फार्मात दिसतोय. याआधीच्या सामन्याला तो मुकला होता. त्यानंतर त्याने अगदी दाबात एन्ट्री केली आहे. एलीट राउंडमधील ग्रुप-एमधील ओडिशाविरुद्धच्या लढतीत त्याने पहिल्याच दिवशी शतक झळकावले आणि दुसऱ्या दिवशी या शतकाचे द्विशतकात रुपांतर करण्यात त्याला यश आले.
दरम्यान, आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी अय्यरने केलेली द्विशतकी खेळी क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून गेली. आयपीएलच्या गत हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ चॅम्पियनही झाला. पण आयपीएल मेगा लिलावाआधी केकेआरच्या फ्रँचायझीने या चॅम्पियन कर्णधाराला रिटेन न करता रिलीज केल्याचे पाहायला मिळाले. आता तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरणार आहे. रणजीतील धमाकेदार शोनंतर त्याची ही किंमत आणखी वाढेल असे अपेक्षित आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडणार का हे पाहण्याजोगे असेल.
Web Title: Shreyas Iyer hits double century in Mumbai vs Odisha ranji live match in Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.