पुढील वर्षी होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी २०२५ ही पाकिस्तानात खेळविली जाणार आहे. भारताने यासाठी आपली टीम पाकिस्तानात पाठविण्यास स्पष्ट नकार कळविला आहे. यामुळे पाकिस्तान आधीच आगपाखड करत असताना आयसीसीने ही टुर्नामेंटच पाकिस्तानकडून काढून घेण्याचा विचार सुरु केला आहे. यामुळे या स्पर्धेत आपला संघ न उरविण्याची तयारी पाकिस्तानी सरकारने सुरु केली आहे.
द डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जर पाकिस्तानकडून चॅम्पिअन्स ट्रॉफी आयोजित करण्याचे अधिकार काढून घेतले तर पाकिस्तानी संघ स्पर्धेतून आपले नाव काढून घेऊ शकतो. पीसीबीच्या सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा धोका या टुर्नामेंटवर आहे. ८ संघ एकाचवेळी पाकिस्तानात असणार आहेत. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघावर जिवघेणा हल्ला झाला होता. यामुळे दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानत खेळण्यास जाण्यासाठी सर्वच देश चिंता व्यक्त करत असतात. अशातच भारताने पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडलेले आहेत. पाकिस्तानला तरीही भारतीय संघ आपली तिजोरी भरण्यासाठी हवा आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी आजी-माजी खेळाडू भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.
भारताने आता स्पष्ट शब्दांत पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसी विचारात पडली आहे. वर्ल्डकपच्या खालोखाल महत्वाची असलेली स्पर्धा भारताशिवाय खेळविणे शक्य नाही. यामुळे आयसीसीने हायब्रिड मॉडेल राबविण्यापेक्षा पाकिस्तान बाहेरच ही स्पर्धा नेली तर असा विचार चालविला आहे. असे झाल्यास पाकिस्तानच्या तोंडचा घास हिरावला जाणार आहे. यामुळे पाकिस्तानने आता पुन्हा रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे.
भारताने टीम पाठविण्यास नकार देताच पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पाकिस्तानी सरकारशी चर्चा सुरु केली आहे. यामध्ये पाकिस्तानी सरकारने जर असे झालेच तर पाकिस्तानी संघ या स्पर्धेत खेळवायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. नकवींनी आधीच हायब्रिड स्पर्धा घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आयसीसी आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.