Axar Patel falls victim to 'unlucky' run-out in IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गकेबरहाच्या मैदानात खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर यजमान संघाने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला स्वस्तात आटोपण्यात यश मिळवले. एका बाजूला ठराविक अंतराने विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाने या सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेल याला बढती दिली. संकट मोचक होऊन तो पुन्हा टीम इंडियाचा डाव सावरण्यात महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावताना दिसला. तो अनलकी ठरला अन् रन आउटच्या रुपात बाद होऊन त्याच्यावर तंबूत परतण्याची वेळ आली.
हार्दिकच्या फटक्यानं केला अक्षर पटेलचा घात
भारतीय संघाच्या धावफलकावर ४ बाद ४५ धावा असताना अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. हार्दिक पांड्याच्या साथीनं त्याने संघाचा डाव सावरण्यास सुरुवातही केली. पण भारतीय संघाच्या डावातील १२ व्या षटकात हार्दिक पांड्याने मारलेला फटका प्रतिस्पर्धी संघाच्या फायद्याचा अन् टीम इंडियासाठी घाट्याचा सीन दाखवणारा ठरला. यात अक्षर पटेल बळीचा बकरा झाला.
लयीत दिसणारा गडी अनलकी ठरला अन् रन आउट होऊन तंबूत परतला
नकाबा पीटरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्याने सरळ रेषेत फटका मारला. पांड्यानं मारलेला चेंडू रोखण्यासाठी पीटर धडपडताना दिसला. यावेळी अक्षरनं क्रीज सोडले होते. चेंडू पीटरच्या हाताला स्पर्श करून स्टंम्पवर आदळला अन् अक्षरचा खेळच खल्लास झाला. दुर्देवीरित्या धाव बाद होऊन अक्षर पटेलला मैदान सोडावे लागले. त्याने २१ चेंडूत २७ धावांची उपयुक्त खेळी केली.
टीम इंडियाची मजल फक्त १२४ धावांपर्यंतच
पहिल्या टी-२० सामन्यात डरबनच्या मैदानात २०० पारची लढाई करुन मालिकेत विजयी सलामी देणाऱ्या टीम इंडियाची दुसऱ्या सामन्यात अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. तिलक वर्मा आणि अक्षर पटेलसह हार्दिक पांड्यानं केलेल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात निर्धारित २० षटकात ६ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारली.
Web Title: South Africa vs India 2nd T20I Axar Patel falls victim to 'unlucky' run-out in IND vs SA 2nd T20I Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.