अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कसोटी : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. पण, हा कसोटीचा वर्ल्ड कप विजेता कसा ठरेल, त्याला किती गुण मिळतील आणि भारतीय संघ अव्वल स्थान कसा पटकावेल, हे सर्व जाणून घेऊया...
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना उद्यापासून खेळणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल.
कोण किती सामने खेळणार ?
या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ पात्र ठरले आहेत. या स्पर्धेंतर्गत इंग्लंड 22 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( 19), भारत ( 18), दक्षिण आफ्रिका ( 16), वेस्ट इंडिज ( 15), न्यूझीलंड ( 14), बांगलादेश ( 14), पाकिस्तान ( 13) आणि श्रीलंका (13) यांचा क्रमांक येतो.
कशी होणार गुणांची विभागणी?
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार विजयी संघाला 60 गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.
कोण आहे अव्वल स्थानावर ?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंकेने 60 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने खाते उघडले आहे आणि ते 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत.
22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून
कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव
कसोटीसीठी वेस्ट इंडिजचा संघ - जेन होल्डर ( कर्णधार ), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.
Web Title: Team India gear up to ICC World Test Championship, campaign start from tomorrow against West Indies, know how point are given
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.