हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर अपयश आले.

By ओमकार संकपाळ | Published: October 16, 2024 03:03 PM2024-10-16T15:03:59+5:302024-10-16T15:04:59+5:30

whatsapp join usJoin us
women t20 world cup 2024 trophy Harmanpreet Kaur may be removed as captain of Team India | हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा

हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशियाई देशांमध्ये दबदबा असलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाला नेहमीप्रमाणे विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर अपयश आले. जगातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताच्या तोंडचा घास पळवत टीम इंडियाला टीकेस पात्र ठरवले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला पुन्हा एकदा अपेक्षित कामगिरी करता आली नाही... कागदावर तगडा दिसणारा भारत मैदानात मात्र सपशेल अपयशी ठरला. स्पर्धेच्या आधी आत्मविश्वासाच्या बाता मारणारी टीम इंडिया सलामीच्याच सामन्यात तोंडावर आपटली. पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई संघांविरुद्धची कामगिरी वगळता टीम इंडियाने उर्वरीत दोन सामन्यांमध्ये केलेला खेळ म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. ३५ वर्षीय हरमनच्या संघाला २०१६ नंतर प्रथमच विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला आता नवीन नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

हरमनप्रीत कौरला वगळून एखाद्या युवा खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी असे जाणकारांचे मत आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणारी हरमन खरोखरच व्हिलन ठरल्याचे दिसते. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. मग राष्ट्रकुल स्पर्धा असो की मग विश्वचषक... अनुभवी भारतीय कर्णधाराला दबावाच्या क्षणी धाडसी निर्णय घेता न आल्याने टीम इंडियाला निसटता पराभव पत्करावा लागला. ७ मार्च २००९ पासून हरमन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या दिवशी वन डे सामन्यातून तिने आपल्या राष्ट्रीय संघाचे तिकीट मिळवले. मिताल राज, झुलन गोस्वामी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन लाभलेली हरमन कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये फारसा ठसा उमटवू शकली नाही. त्यात तिच्या आक्रमक शैलीने नेहमीच टीकाकारांना आमंत्रण दिले. आशियाई स्पर्धा वगळता कर्णधार म्हणून बहुतांशवेळा तिच्या पदरी निराशा आली. भारताची माजी कर्णधार मिताली राजने आता हरमनच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना टीम इंडियाला नवीन नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद केले. 

एप्रिल २०१३ मध्ये मिताली राजची उत्तराधिकारी म्हणून हरमनने भारताच्या वन डे संघाचे कर्णधारपद स्वीकारले. तेव्हापासून आजतागायत ती या पदावर आहे. एक दशक उलटले तरी हरमनला म्हणावी तशी कामगिरी करता न आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय देखील धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, २०१६ प्रमाणे यंदा भारताला ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच माघारी परतावे लागले. हरमनप्रीतला खरेच या पदाचा त्याग करावा लागल्यास नवीन कर्णधार कोण असेल हे पाहण्याजोगे असेल. विद्यमान उपकर्णधार स्मृती मानधनावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पण, मिताली राजने जेमिमा रॉड्रिग्जसारख्या युवा खेळाडूवर विश्वास दाखवलाय. मात्र, अष्टपैलू खेळीसाठी प्रसिद्ध असलेली २८ वर्षीय दीप्ती शर्मा तिच्या खेळीने सर्वांना प्रभावित करत आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने या निवडीबाबत काही धक्कातंत्राचा वापर केल्यास नवल वाटण्यासारखे काही नाही.

मागील मोठ्या कालावधीपासून जगातील सर्वात ग्लॅमरस संघाचे नेतृत्व करत असलेली हरमनप्रीत कौर तिच्या तापट स्वभावासाठी ओळखली जाते. अनेकदा तर भारताच्या पराभवाचे खापर यावर देखील फोडले जाते; भारताचा बांगलादेश दौरा असो की मग ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेली एकमेव कसोटी... भारताने या कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला होता. पण, कर्णधार ॲलिसा हिली आणि हरमनप्रीत कौर असा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता. हिलीने हरमनच्या रागावर मौन बाळगून उत्तर दिले अन् चाहत्यांच्या मनात घर केले. यावरुन माजी खेळाडूंसह चाहत्यांनी हरमनला घरचा आहेर देत लक्ष्य केले. याउलट ऑस्ट्रेलियन कर्णधार हिलीने विजेत्या टीम इंडियाचे अभिनंदन करताना खेळभावना दाखवली आणि यजमान संघाचे स्वत: फोटोशूट केले होते. हे सांगण्याचा उद्देश्य एकच तो म्हणजे हरमनचा हा अनोखा तापट स्वभाव आणि आक्रमक शैली. सामना सुरू असताना अनेकदा माझ्या तोंडून तिखट शब्द अथवा शिवी निघते याची कबुलीही देण्यास हरमन चुकली नव्हती. त्यामुळे भारताच्या पराभवाचे खापर फोडताना कित्येकदा चाहत्यांना हरमनच्या या स्वभावाचा आधार घेतला.  

भारतीय संघाने सर्वाधिक आठवेळा आशिया चषक उंचावला असला तरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या अव्वल संघांविरुद्ध टीम इंडिया नेहमीच चीतपट झालीय. कधी आत्मविश्वासाची कमी तर कधी अतिआत्मविश्वास भारताला महागात पडला. मागील दहा सामन्यांध्ये हरमनप्रीत कौरला केवळ तीनवेळा अर्धशतकी खेळी करता आली आहे. अलीकडेच विश्वचषकातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ५४ धावा कुटल्या. मात्र, तिच्या या खेळीचा प्रतिस्पर्धी संघालाच फायदा झाला. विकेटांची मालिका सुरू असताना तिने संयम, साजेशी अन् संथ खेळी करण्यावर भर दिला... पण अखेरीस टीम इंडियाला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुढे याचाच भारताला फटका बसला अन् पाकिस्तानच्या पराभवासह टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

खरे तर २०२३ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. फायनलचे तिकीट मिळवून देणाऱ्या या लढतीत टीम इंडिया सहज विजय मिळवेल असे अपेक्षित असताना सर्वकाही उलटे झाले. ऐनवेळी हरमनप्रीत कौर हास्यास्पदपणे झालेली धावबाद अन् भारताचा कोसळलेला गड चाहत्यांना निराश करुन गेला. तेव्हा देखील ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवून तमाम भारतीयांना धक्का दिला. त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवत सोनेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाची कमी असल्याने टीम इंडियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता नेतृत्व बदलून नवीन रणनीतीसह खेळण्याची गरज असल्याचे दिसते. 

हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मानधना भारताच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हरमन अनुपस्थितीत असताना अनेकदा स्मृतीने ही जबाबदारी चोख पाडली. मात्र, विश्वचषकासारख्या एकाही स्पर्धेत तिच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. पण, चाहत्यांचा संताप, क्रिकेट वर्तुळातील चर्चा, माजी खेळाडूंनी सुचवलेले पर्याय पाहता नेतृत्व बदल अटळ असल्याचे दिसते. आगामी काळात भारत आपल्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेते का याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. 

Web Title: women t20 world cup 2024 trophy Harmanpreet Kaur may be removed as captain of Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.