ठेवीदारांची १ कोटी ११ लाखाने फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 09:35 PM2019-12-17T21:35:44+5:302019-12-17T21:37:48+5:30

तीन ते चार वर्षापूर्वी विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था स्थापन करण्यात आली होती

1 crore 11 lakh fraud of depositors | ठेवीदारांची १ कोटी ११ लाखाने फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

ठेवीदारांची १ कोटी ११ लाखाने फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Next

गोंदिया: सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवलेल्या ग्राहकांचे पैसे अध्यक्ष व सचिवाने १ कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपये बोगस कर्जधारकांना कर्ज स्वरुपात वाटप केले. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 मागील तीन ते चार वर्षापूर्वी विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था स्थापन करण्यात आली. संस्था अध्यक्ष म्हणून पिंकी बैस हा इसम काम पाहत होता. तसेच एजंटचे सुद्धा काम करीत होता. दररोज लोकांकडून पैसे गोळा करून बँकेत पैसे जमा न करता मागील काही दिवसांपासून लाखो रुपये घेऊन तो पसार असल्याची माहिती आहे. सलंगटोला येथील उमेश दोनोडे यांचे सदर पतसंस्थेत खाते होते. पिंकी बैस हा एजंट दर आठवड्यात त्यांच्याकडून दोन हजार घेत होता. याप्रमाणे त्यांनी ६६ हजार रुपये जमा केले. दोनोडे यांना पैशांची गरज पडल्याने ते संस्थेत विड्रॉल करण्याकरीता गेले असता त्यांना विड्रॉल देण्यास मनाई करण्यात आली. तसेच त्यांना तुमच्या नावाचे खाते नसल्याचे लिहून देण्यात आले. यावर त्यांनी ९ आॅगस्ट रोजी सालेकसा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदविली. परंतु त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.

त्यानंतर दोनोडे यांनी २३ आॅगस्ट रोजी रजिस्ट्री पोस्टद्वारे पोलीस अधीक्षक तसेच सालेकसा पोलीस निरीक्षकांना लिखीत तक्रार केली. परंतु पोलीसांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले होते. आरोपींवर कारवाई करण्यात पोलीस कुचराई करीत होते. सदर पतसंस्थेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भात लोकमतने २४ सप्टेंबर रोजी बातमी प्रकाशित केली होती.अनेक लोकांकडून बैस याने पैसे गोळा केले व पैसे जमा न करता परस्पर हडप केल्याची ओरड सुरू होती. त्यानंतर आता आॅडीट झाले असता त्या आॅडीटमध्ये अपहार करून कोट्यवधी रूपये हडपण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ठेवीदारांनी ठेवी म्हणून विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवलेला पैसा कर्ज स्वरुपात देण्यात आला. पैशाच्या कॅशबुकमधील रोख शिल्लक घटवून संस्थेच्या बँक खात्यातून रोख रक्कम आहारीत करुन कोणत्याही कारणाशिवाय मोठ्या प्रमाणात रक्कमा स्वत:च्या नावाने अग्रीम म्हणून घेऊन अभिकर्ता लोकांकडून जमा केलेल्या ठेवीचे पैसे संस्थेत जमा न करता स्वत:साठी वापरुन बोगस कर्जधारकांना संस्थेचा पैसा कर्जस्वरुपात वाटप केला.

संस्थेच्या कामकाजासाठी येणारा खर्च अधिक दाखवून १ कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपयाची फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात उमेश बाबूलाल दोनोडे यांनी तक्रारही केली होती. याप्रकरणात आमगाव येथील लेखा परीक्षक राजेश पांडूरंग बावनथडे (४४) यांनी आॅडीट केले असता आॅडीटमध्ये सदर रक्कमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.परिणामी याप्रकरणात संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि अभिकर्त्त्यावर भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सहकलम ३ वित्तीय आस्थापनेमधील हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एम.पी.आय.डी.१९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तीन आरोपींवर गुन्हा दाखल
विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंह बैस, संचालक (रेकार्ड लिहणारा) प्रल्हाद भाऊदास राऊत, संस्थेच्या कर्मचारी अल्का योगेश बैस या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणात आणखी काही मासे अडकण्याची शक्यता आहे. 

Web Title: 1 crore 11 lakh fraud of depositors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.