मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाखांचे एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:39 AM2020-12-12T06:39:35+5:302020-12-12T06:39:42+5:30
मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. फ्लुगांस उर्फ रोलास उर्फ मुस्तफा लाउड अका (३१) जरमन जेरी अबाह (२९) या दोन परदेशी नागरिकांसह दिनानाथ उर्फ तुंटन रंगनाथ चौहान (३३), सन्नी संजय साहू (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कांदिवली पश्चिमेकडील खजुरिया नगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ला मिळाली. त्यानुसार कक्ष ११ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्याच दरम्यान दोन जण रिक्षामधून आले. काही वेळाने दुचाकीवरून दोन परदेशी नागरिक तेथे धडकले. ते परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तींना पॅकेट देत असताना आढळून येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ७०० ग्रॅम एमडी आढळले आहे. त्याचे मूल्य १ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सराईत गुन्हेगार
अटक आरोपींपैकी एक जण अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे दोन तर माटुंगा पोलीस ठाणे येथे एक असे शारीरिक दुखापत, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचा गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.