भिवंडीत १ कोटी ६७ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनासह मालमत्ता गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 06:12 PM2021-10-03T18:12:47+5:302021-10-03T18:13:00+5:30
मागील पंधरा दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व ३४ लाख किमतीची एकूण पाच वाहने असा एकूण २ कोटी १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या कारवाई मुळे गुटखा माफियां मध्ये खळबळ उडाली आहे .
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीत अन्न व औषध प्रशासन व मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार टेम्पो व एका कंटेनर मधून तब्बल १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा शनिवारी जप्त करण्यात आला आहे.
ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांना गुप्त बातमीदारा मार्फत भिवंडीत कंटेनर व टेम्पो मधून गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली असतानाच याची खबर ठाणे गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हे कक्षास लागली व त्यानंतर शंकर राठोड व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी रा.सि. बोडके ,एम. ए. जाधव तसेच मालमत्ता गुन्हे कक्ष गुन्हे शाखा, ठाणे शहर येथील सहा. पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, पो. उप निरी. रविंद्र दळवी, सपोउपनि शामराव कदम, नामदेव देशमुख, स्वप्नीले प्रधान, पोहवा गणेश पाटील, वसंत बेलदार, बाळासाहब भोसले, अर्जुन कराळे, नासंग शिरसागर, आशा गोळे यांच्या संयुक्त पथकाने भिवंडीतील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर पाळत ठेवून भिवंडी शहराच्या दिशेने येणारे चार टेम्पो अडवीत त्यांच्या कडे गाडीची कागदपत्रे व मालाची चौकशी सुरू केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने टेम्पोतील मालाची तपासणी करता त्यामध्ये एकूण ६३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा सुगंधी तंबाखू आढळून आली .
या कारवाई दरम्यान एक टेम्पो चालक तेथून पसार होण्यात यशस्वी झाला तर तीन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा भिवंडी तालुक्यातील कालवार येथील श्री शुभम इंडस्ट्रीयल पार्क येथील गोदामा समोर उभ्या असलेल्या वाहनातून भरल्याचे सांगितले. त्यांनतर पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तेथे उभ्या असलेल्या कंटेनर ची तपासणी केली असता त्यामध्ये १ कोटी ३ लाख ९३ हजार रुपयांचा राजनिवास गुटखा,प्रिमियम एक्स. एल.०१, जाफरानी जर्दा,गोल्ड ९०००,पी.के. गुटखा या नावाने विक्री केला जाणारा गुटखा आढळून आला तर कंटेनर चालक पसार झाला.
हा सर्व मुद्देमाल व चार टेम्पो एक कंटेनर जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांनी टेम्पो चालकांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी रविवारी पहाटे याबाबत गुन्हा दाखल करीत टेम्पो चालक रवि भद्रीया नायक,मोहम्मद हनिफ जमिल अहमद शेख ( रा.भिवंडी ) व शंकर पुकीर रजक ( रा.कामण ता वसई ) या तीन चालकांना ताब्यात घेतले आहे.
मागील पंधरा दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व ३४ लाख किमतीची एकूण पाच वाहने असा एकूण २ कोटी १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या कारवाई मुळे गुटखा माफियां मध्ये खळबळ उडाली आहे .